मुख्यमंत्री काय म्हणाले नि मनपाने काय पाठवले? आमदार सुरेश भोळे संतापले; गाळे प्रश्नी सुधारित प्रस्तावाचे आदेश!

मे 16, 2026 8:05 AM

जळगाव लाईव्ह न्यूज । जळगाव शहर महानगरपालिकेच्या गेल्या १४ वर्षांपासून प्रलंबित असलेल्या मुदत संपलेल्या गाळ्यांचा प्रश्न आता पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गाळेधारकांना दिलासा देण्यासाठी २ ते ३ टक्के दरानुसार भाडे आकारणीचा प्रस्ताव मागवला होता; मात्र मनपा प्रशासनाने त्यात नुकसानीचा अनावश्यक मुद्दा समाविष्ट केल्याने हा प्रस्ताव मूळ सूचनेनुसार झालेला नाही. त्यामुळे मनपा प्रशासनाने २ ते ३ टक्क्यांचा सुधारित प्रस्ताव नव्याने शासनाकडे पाठवावा, अशा कडक सूचना आमदार सुरेश (राजूमामा) भोळे यांनी दिल्या आहेत. जळगाव येथील पद्मालय विश्रामगृहात आयोजित आढावा बैठकीनंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

rajumama bhole

पत्रकार परिषदेत माहिती देताना आमदार सुरेश भोळे म्हणाले की, “गाळेधारकांना न्याय देण्यासाठी आमचा सातत्याने पाठपुरावा सुरू आहे. स्वतः मुख्यमंत्र्यांनी यावर २ ते ३ टक्के दराने भाडे आकारणीचा प्रस्ताव सादर करण्यास सांगितले होते. परंतु, मनपा प्रशासनाने पाठवलेल्या प्रस्तावात विनाकारण नुकसानीचा आणि इतर अनावश्यक बाबींचा उल्लेख केल्यामुळे प्रस्तावाचा मूळ हेतूच भरकटला आहे. मनपाच्या या आडमुठ्या धोरणामुळेच हा प्रश्न रखडला आहे.”

मनपा प्रशासनाने केलेल्या या घोळानंतर आमदार भोळे यांनी तातडीने मनपा उपायुक्तांना जुन्या प्रस्तावातील त्रुटी दूर करून २ ते ३ टक्क्यांचा सुधारित आणि स्पष्ट प्रस्ताव नव्याने तयार करून शासनाकडे पाठवण्याचे आदेश दिले आहेत.

गाळेधारकांचा हा प्रश्न अत्यंत संवेदनशील असून तो लवकरात लवकर मार्गी लागणे गरजेचे आहे. यासाठी आमदार सुरेश भोळे यांनी मनपा आयुक्तांना एक महत्त्वपूर्ण सुचवले आहे. “प्रशासनाने हा प्रश्न रेंगाळत न ठेवता थेट महासभेत हा विषय मंजुरीसाठी आणावा आणि महासभेच्या माध्यमातून २ ते ३ टक्क्यांचा अंतिम निर्णय घ्यावा,” असे आवाहन भोळे यांनी केले आहे. आता आमदार भोळेंच्या या आक्रमक पवित्र्यानंतर मनपा प्रशासन काय पावले उचलते, याकडे सर्व गाळेधारकांचे लक्ष लागले आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now