शाळकरी विद्यार्थिनींमध्ये निधी फाउंडेशनने केली जनजागृती
जळगाव लाईव्ह न्यूज । २९ जून २०२३ । शहरातील काशीबाई उखाजी कोल्हे विद्यालय आणि ज्युनिअर कॉलेजमध्ये निधी फाउंडेशनच्या माध्यमातून मासिक पाळी आणि महिला सुरक्षा या विषयावर जनजागृती करण्यात आली. निधी फाउंडेशनच्या अध्यक्षा वैशाली विसपुते यांनी विद्यार्थिनींना सेफ्टी टिप्स पॉकेट कार्डचे वितरण देखील यावेळी केले.
निधी फाउंडेशनच्या माध्यमातून नुकतेच मासिक पाळी आणि महिला सुरक्षा हेल्पलाईन विषयी जनजागृती करणाऱ्या पॉकेट कार्डचे अनावरण करण्यात आले होते. समाजातील प्रत्येक घटकापर्यंत पोहचून जनजागृती करण्यासाठी निधी फाउंडेशन कार्य करीत आहे. शहरातील काशीबाई उखाजी कोल्हे विद्यालय आणि ज्युनिअर कॉलेज येथे विद्यार्थिनींना मासिक पाळी, समज-गैरसमज, शरीर स्वच्छता, स्वसंरक्षण या विषयावर निधी फाउंडेशनच्या अध्यक्षा वैशाली विसपुते यांनी मार्गदर्शन केले.
प्रसंगी शाळेच्या मुख्याध्यापिका ज्योती गोसावी, पर्यवेक्षक सतीश खडके, उपशिक्षिका भारती राणे, उपशिक्षिका दिपाली चौधरी आदी उपस्थित होते. निधी फाउंडेशनकडून विद्यार्थिनींच्या समस्या, शंका समजून घेत त्याचे निरसन केले. कार्यक्रमात विद्यार्थिनींना निधी फाउंडेशनच्या पॉकेट कार्डचे वितरण देखील करण्यात आले.