लग्नाची हळद निघण्यापूर्वीच काळाचा घाला; जामनेर तालुक्यातील नवविवाहितेचा उष्माघाताने मृत्यू

मे 14, 2026 11:52 AM

जळगाव लाईव्ह न्यूज । जळगाव जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून उन्हाने रौद्र रूप धारण केले आहे. मे महिन्याच्या सुरुवातीपासूनच पारा ४५ अंशांवर पोहोचल्याने उष्माघाताचा धोका वाढला आहे. अशातच, जामनेर तालुक्यातील मोहाडी येथील एका २० वर्षीय नवविवाहितेचा उष्माघात सदृश आजाराने मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. लग्नानंतर अवघ्या २० व्या दिवशीच या नवविवाहितेवर काळाने झडप घातल्याने संपूर्ण जिल्ह्यात हळहळ व्यक्त होत आहे.

vaishali bhil

पाचोरा तालुक्यातील बाळद येथील वैशाली भिल (वय २०) हिचा विवाह २३ एप्रिल रोजी मोहाडी येथील सुनील भिल याच्याशी झाला होता. वैशाली दोन्ही पायांनी दिव्यांग होती, तर सुनीलला बोलताना अडथळा येत असे. एकमेकांच्या उणिवा भरून काढत ‘एकमेकांचा आधार बनू’ या जिद्दीने हे कुटुंब उभे राहत होते. मात्र, लग्नाची हळद पूर्णपणे निघण्यापूर्वीच नियतीने या दांपत्याची ताटातूट केली.

नेमकी घटना काय?

बुधवारी सकाळपासूनच वैशालीला उन्हाच्या तीव्रतेमुळे उलट्या आणि चक्कर येण्याचा त्रास सुरू झाला. प्रकृती खालावल्याने तिला सायंकाळी ४ वाजता नेरी येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, तिची प्रकृती चिंताजनक असल्याने डॉक्टरांनी तिला तत्काळ जळगाव येथे हलवण्याचा सल्ला दिला. दुर्दैवाने, जळगावला नेत असताना रस्त्यातच तिची प्राणज्योत मालवली. वैद्यकीय अधिकाऱ्यांनी प्राथमिक अंदाज उष्मघाताचा व्यक्त केला असला तरी शवविच्छेदन अहवालानंतर मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.

चार महिन्यांत कुटुंबावर दुसरा डोंगर कोसळला

वैशालीच्या कुटुंबावर गेल्या चार महिन्यांतील हा दुसरा मोठा आघात आहे. अवघ्या चार महिन्यांपूर्वीच तिच्या वडिलांचा चक्कर येऊन पडल्याने मृत्यू झाला होता. घरातील मोठी मुलगी म्हणून वैशाली सर्वांची लाडकी होती. वडिलांच्या निधनानंतर तिचे लग्न लावून जबाबदारी पूर्ण करण्यात आली होती, पण नियतीला तिचे सुख पाहवले नाही. वैशालीच्या पश्चात आई, चार बहिणी आणि एक भाऊ असा परिवार आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now