⁠ 
गुरूवार, मार्च 28, 2024

चिंतेत आणखी भर ! राज्यात ओमायक्रॉनच्या नवीन व्हेरिएंटचे ७ रुग्ण आढळले, आरोग्यमंत्र्यांनी दिल्या ‘या’ सूचना

जळगाव लाईव्ह न्यूज । २९ मे २०२२ । महाराष्ट्रात मागील काही महिन्यांपूर्वी आटोक्यात आलेल्या कोरोनाने(Corona) पुन्हा एकदा चिंता वाढवली आहे. करोनाच्या ओमायक्रॅान विषाणूचे नवे उत्परिवर्तन असलेले बीए.४ आणि बीए.५ चे रुग्ण महाराष्ट्रात आढळून आले आहे. त्यामुळे प्रशासनाची चिंता पुन्हा वाढली आहे. यावरुन राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे (Rajesh Tope) यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला आहे. यावेळी त्यांनी राज्यातील जनतेला आवाहन केलं आहे. यावेळी त्यांनी क्लस्टर जिल्ह्यांना काळजी घेण्यासाठी सूचना करण्यात आली असल्याची माहिती दिली आहे.

राज्यात कोरोनाच्या ओमायक्रॉन (Omicron) व्हेरिएंट नवीन म्यूटेशन असलेले BA.4 आणि BA.5 चे रुग्ण राज्यात आढळून आले आहेत. ज्यात BA.4 चे 4 आणि BA.5 चे 3 रुग्ण आहेत. हे एकूण सात रुग्णांपैकी 4 रुग्ण पुरुष आणि 3 महिला आहे. 5 रुग्णांचं वय 50 पेक्षा जास्त आहे. 2 रुग्ण 20 ते 40 वयोगटातील आहेत. तर एक रुग्ण 10 वर्षांपेक्षा लहान वयाचा आहे. याआधी भारतात हैदराबाद या व्हेरिएंटचा देशातील पहिला रुग्ण सापडला होता.

तसेच काल मुंबईत अचानकपणे 500 नवीन रुग्ण आढळून आले. क्लस्टर भाग असणाऱ्या ठाणे, पुणे, पालघर या ठिकाणी देखील रुग्णांची संख्या वाढत आहे. आपल्याला काही उपाययोजना कराव्या लागणार असून आज ज्या 30 ते 40 हजार चाचण्या आम्ही करत आहोत त्यात ही वाढ करावी लागणार आहे. क्लस्टर जिल्ह्यांना त्यासंबंधी सूचना करण्यात आल्या आहेत. काळजी करण्याचं, घाबरण्याचं सध्या काही कारण नाही, पण काळजी घ्यावी लागेल असे आरोग्यमंत्री टोपे यांनी सांगितले आहे.