जळगाव लाईव्ह न्यूज । जळगाव-उधना मार्गावरील रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर असून दक्षिण रेल्वेने प्रवाशांची वाढणारी गर्दी लक्षात घेऊन कोईम्बतूर–जयपूर साप्ताहिक विशेष एसी एक्स्प्रेस १३ ऑगस्टपासून पुन्हा सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे. या विशेष गाडीला जळगाव जिल्ह्यातील भुसावळ, जळगाव आणि धरणगाव येथे थांबा असून यामुळे उत्तर आणि दक्षिण भारतादरम्यान प्रवास करणाऱ्या प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे.

धरणगाव येथे या विशेष रेल्वेला थांबा मिळावा, अशी मागणी अनेक वर्षांपासून स्थानिक प्रवासी आणि धरणगाव तालुका प्रवासी मंडळाकडून सातत्याने केली जात होती. प्रवाशांची वाढती संख्या, राजस्थानकडे जाणाऱ्या व्यापाऱ्यांची गरज आणि दक्षिण भारताशी वाढता संपर्क लक्षात घेऊन रेल्वे प्रशासनाकडे वारंवार पाठपुरावा करण्यात आला होता.

गाडी क्रमांक ०६१८१ कोयंबतूर–जयपूर साप्ताहिक विशेष एक्स्प्रेस प्रत्येक गुरुवारी २:३० वाजता कोईम्बतूर जंक्शनवरून सुटेल. यानंतर ती दुसऱ्या दिवशी (शुक्रवारी) भुसावळ स्थानकावर दुपारी १ वाजून ३५ मिनिटाने, जळगावला दुपारी २ वाजून १० मिनिटाने आणि धरणगाव स्थानकावर २ वाजून ५८ मिनिटांनी पोहोचेल. त्यानंतर तिसऱ्या दिवशी जयपूर येथे दुपारी १:२५ वाजता पोहोचेल
तर गाडी क्रमांक ०६१८२ जयपूर–कोयंबतूर साप्ताहिक विशेष एक्स्प्रेस रविवारी रात्री १० वाजून ५ मिनिटाने जयपूर येथून प्रस्थान करेल यांनतर सोमवारी सायंकाळी ६ वाजून ३८ मिनिटांनी धरणगावला पोहोचेल. जळगावला रात्री ७ वाजून ३० मिनिटाने तर भुसावळ स्थानकावर रात्री ८ वाजून ०५ मिनिटाने पोहोचेल. यांनतर चौथ्या दिवशी सकाळी ८ वाजून ३० मिनिटाने कोयंबतूरला पोहोचेल. दोन्ही बाजूने धावणाऱ्या गाड्यांचे वेळापत्रक लक्षात घेता प्रवाशांना राजस्थानसह दक्षिण भारताकडे जाणे सोयीचे ठरणार आहे.
धरणगाव स्थानकावरून जयपूरसह राजस्थानातील इतर शहरांकडे जाण्यासाठी उपलब्ध असणारी ही एकमेव थेट रेल्वे सेवा आहे. त्यामुळे प्रवाशांना जळगाव, भुसावळ किंवा इतर मोठ्या स्थानकांवर जाऊन रेल्वे बदलण्याची गरज राहणार नाही.तसेच पाठपुरावा करून गाडीचा थांबा निश्चित करण्यात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या खासदार स्मिता वाघ यांचेही आभार मानण्यात आले आहेत.
या महत्वाच्या स्थानकांवर असेल थांबा?
या विशेष गाड्या तिरुप्पूर, इरोड, सेलम, जोलारपेट्टाई, कातपाडी, रेनिगुंटा, काचेगुडा, हजूर साहिब नांदेड, पूर्णा, वाशीम, अकोला, मलकापूर, भुसावळ, जळगाव, धरणगाव, नंदुरबार, उधना, भरूच, वडोदरा, गोद्रा, रतलाम, जौरा, मंदसोर, चित्तूरगड आणि अजमेर यांसारख्या प्रमुख स्थानकांवर थांबतील.







