जळगाव लाईव्ह न्यूज । २१ एप्रिल २०२४ । असंख्य भाविकांचे श्रध्दास्थान असणारे बोदवड तालुक्यातील शिरसाळा मारूती देवस्थानचे नामकरण करण्यात आले आहे. आता हे देवस्थान यापुढं श्री सिध्देश्वर हनुमान म्हणून ओळखले जाणार आहे.
शिरसाळा येथे १६ एप्रिल पासून श्रीराम कथेचे आयोजन करण्यात आले असून जनार्दन हरीजी महाराज या कथेचे गायन करीत आहेत. यापूर्वी शिरसाळा मास्तीला नाव नव्हते. शिरसाळा हे गावाचे नाव आहे. पण मारुतीरायांचे नाव नव्हते, त्यामुळे शनिवारी श्रीराम कथेच्या पाचव्या दिवशी श्री हनुमंतरायाचे नामकरण करण्यात आले.
जनार्दन हरीजी महाराज, सर्व विश्वस्त व भाविकांच्या साक्षीने शनिवारच्या दिवशी शिरसाळा मारुतीचे नामकरण सिद्धेश्वर हनुमानजी असे करण्यात आले. शिरसाळा मारुतीची स्थापना समर्थ रामदास स्वामी यांनी केली आहे. ठिकाण सिद्ध जागृत व नवसाला पावणारे व सत्याचा देव म्हणून ओळख आहे. त्यामुळे कथेत सिद्धेश्वर हनुमान असे नामकरण करण्यात आले.
यावेळी एकच जयघोष झाला व सर्व भक्तांनी श्रीराम चंद्र व सिद्धेश्वर हनुमानाच्या नावाचा गजर केला. त्यानंतर कथेत रक्तदान शिबिराचे देखील आयोजन करण्यात आले होते. या शिबिरात भर उन्हाळ्यात २६ दात्यांनी रक्तदान केले.