⁠ 
बुधवार, एप्रिल 24, 2024

मेहरुणचे जलप्रदूषण रोखण्यासाठी मनपाचा प्लॅन तयार : लवकरच करणार पहाणी

जळगाव लाईव्ह न्यूज । १२ फेब्रुवारी २०२३ । जळगाव मेहरूण तलावाच्या परिसरात रहिवास वाढला आहे. आगामी काळातही त्यात आणखी वाढ होणार आहे. त्यामुळे भविष्यातील ५० वर्षांचा विचार करता परिसरातील सांडपाण्याचा निचरा होवून तलावाचे जलप्रदूषण कसे रोखता येईल यासाठी धोरण ठरवले जाणार आहे. त्यासाठी जैन इरिगेशनच्या तज्ञांसह क्रेडाईच्या पदाधिकाऱ्यांसोबत संयुक्त पाहणी दौरा आयोजीत केला जाणार आहे.

शासनाने तलाव परिसरातील रहिवासी बांधकामाला परवानगी दिली आहे. त्यामुळे तलावाच्या दक्षिणेला आता रहिवासी योजना व शाळांचे बांधकाम सुरू असून सांडपाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.

आयुक्तपदाचा वाद निर्माण होण्यापूर्वी आयुक्त गायकवाड यांनी मेहरूण तलावात जाणारे सांडपाणी रोखण्यासाठी अहमदाबाद येथील संस्थेकडून डीपीआर तयार करण्याचा निर्णय घेतला होता.

तलावात तीन मेहरुण भागातून सांडपाणी शिरते. त्यामुळे तलावाच्या दिशेने येणाऱ्या सांडपाण्यावर प्रक्रीया करण्यासाठी एसटीपी प्लान्ट उभारणे अथवा सांडपाणी पाइपलाइनच्या माध्यमातून थेट लेंडी नाल्यात सोडणे असे दोन पर्याय आहेत. त्याबाबत पुढच्या आठवड्यात प्रत्यक्ष पाहणी करून तोडगा काढला जाणार आहे.

जैन इरिगेशन सिस्टिम कंपनीकडून अशा स्वरूपाच्या योजनांवर काम केले जाते. याशिवाय शहरातील बांधकाम क्षेत्रातील जाणकारांनाही मोठ्या शहरांमधील योजनांचा अभ्यास असतो. त्यामुळे भविष्यातील जलप्रदूषण रोखण्यासाठी संयुक्तरित्या पाहणी करून निर्णय घेण्याचे नियोजन आहे..