⁠ 
शुक्रवार, मार्च 29, 2024

नगरपालिका मक्तेदाराची कामगाराला पैसे न देता धमकी, न्यायालयात मागितली दाद

जळगाव लाईव्ह न्यूज । २१ नोव्हेंबर २०२२ । एका मक्तेदाराने बगीचा देखभाल कामासाठी लावलेल्या मजुरास मजुरीचे पैसे न देता कामावरून काढून टाकले व पैसे मागितले असता त्याला शिवीगाळ करीत हातपाय तोडून टाकेल, अशी धमकी दिली. हा प्रकार यावलात घडला असून या प्रकरणी यावल पोलिसात अदखलपात्र गुन्हा नोंदवून न्यायालयात दाद मागण्यात आली आहे.

यावल शहरातील शिवाजीनगर भागातील रहिवासी प्रमोद मधुकर भोईटे यांनी यावल पोलिसात दिलेल्या फिर्यादीनुसार, ते नगरपालिकेचे मक्तेदार अनिल मंगेश पाटील (रा.निसर्ग कॉलनी, पिंप्राळा, जळगाव) यांच्याकडे नगरपालिकेच्या बगीचा देखभाल दुरुस्तीसाठी मजूर म्हणून कामाला होते. मजुरीचे 80 हजार रुपये मक्तेदाराकडे निघत होते व भोईटे यांनी वारंवार अनिल पाटील यांच्याकडे पैशांची मागणी केली मात्र त्यांनी पैसे न देता प्रमोद भोईटे यांना अश्लील शिवीगाळ केली व तुला एक कवडी देणार नाही तुझ्याने जे होईल ते करून घे, अशी धमकी देत तुझे हात पाय तोडून टाकेल, अशी धमकी दिली.

या प्रकरणी यावल पोलिसात अदखलपात्र गुन्हा नोंदवण्यात आला, मात्र पोलिसांनी कारवाई न केल्याने प्रमोद भोईटे यांनी यावल न्यायालयात तक्रार केली. आता या प्रकरणी यावल न्यायालयाच्या वतीने या संपूर्ण गुन्ह्याच्या संदर्भात यावल पोलिसांकडून चौकशीचा अहवाल मागवण्यात आला आहे. आहे. पुढील तपास सहायक फौजदार विजय पासपोळ करीत आहे.