शहरातील अनाधिकृत फलकांकडे मनपाचे अक्षम्य दुर्लक्ष

जळगाव लाईव्ह न्यूज । १७ एप्रिल २०२३ । जळगाव शहरातील विविध भागांमध्ये वेगवेगळ्या क्षेत्रातील नागरिकांकडून बॅनर्स लावण्यात येत आहेत. यापैकी बहुतेक बॅनर्सलावण्यासाठी महापालिकेची परवानगी घेतण्यात आली नसल्याचे दिसून येत आहे.

काही बॅनर्स परवानगीत दिलेल्या कालावधीपेक्षा जास्त दिवस त्या ठिकाणी लावलेले दिसतात तरीही मनपा कोणतीही कारवाई करत नसल्याचे दिसत आहे. मनपाच्या शाखा अभियंत्याकडून किंवा अतिक्रमण विभागाकडून कारवाई केली जात नाही. त्यामुळे शहराचे विद्रुपीकरण करणाऱ्यांची हिम्मत वाढत असून आपलं कोणीच काही करू शकत नाही, असा समज पसरायला सुरुवात झाली आहे.

मनपा आयुक्त डॉ. विद्या गायकवाड यांनी दि. ३ मार्च रोजी शहरातील अनधिकृत बॅनर्सवर कारवाईसाठी आदेश काढले होते. या आदेशात बांधकाम युनिट अंतर्गत येणारे शाखा अभियंता, कनिष्ठ अभियंता यांना अनधिकृत बॅनर्स, रस्त्यांवरील बांधकाम साहित्यविरोधात कारवाई करण्याचे अधिकार देण्यात आलेआहेत. त्यांनी शहरातील सर्व विना परवानगी असलेले बॅनर्स काढून संबधितांवर कारवाई करावी व त्याचा अहवाल आयुक्तांना सादर करावा असे नमुद करण्यात आले आहे. तसेच ज्या अभियंत्यांकडून कामात कुचराई केली जाईल त्यांच्यावर जबाबदारी निश्चित करून प्रशासकीय कार्यवाही प्रस्तावित करण्यात येईल, असा इशारा देखील आयुक्त विद्या गायकवाड यांनी दिला होता.

परंतु तरी देखील शाखा अभियंता, कनिष्ठ अभियंता यांच्याकडून शहरातील अनधिकृत बॅनर्सविरूध्द कारवाई होत नसल्याचे दिसून येत आहे. स्वातंत्र्य चौकात लावण्यात आलेल्या एका बॅनर्सच्या परवानगीची मुदत दि.१३ रोजी संपुष्ठात आलेली असतांना सदर बॅनर हे दि. १७ पर्यंत जैसे थे आहे. अश्याच पध्दतीने शहरातील विविध भागात अनाधिकृत बॅनर्स लागलेले असून शहराचे विद्रुपीकरण होत आहे. त्यामुळे मनपा आयुक्त डॉ. विद्या गायकवाड हे संबधित अधिकारी कर्मचारी यांनी कामात केलेल्या कुचराई लक्षात घेवून त्यांच्यावर कारवाई करतील का ? याकडे शहरातील नागरिकांचे लक्ष लागून आहे.