⁠ 
गुरूवार, एप्रिल 25, 2024

मनपा विशेष : जुन्या अपार्टमेंटला ६ तर नवीन पार्टमेंटला अमृत याेजनेचे १ नळ कनेक्शन मिळणार

,

जळगाव‎ लाईव्ह न्यूज । मनपा विशेष । शहरातील अपार्टमेंटमध्ये अमृत याेजनेचे किती नळ कनेक्शन द्यायचे याबाबत शुक्रवारी महापालिकेत झालेल्या सर्वपक्षीय पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत धाेरण ठरविण्यात आले आहे . ज्या अपार्टमेंटमध्ये पाणी साठवण्यासाठी जागा नाही तिथे सहा कनेक्शन देण्यात येतील तर नवीन अपार्टमेंटमध्ये मागणीनुसार एक अथवा दाेन कनेक्शन दिले जाणार आहे.


अमृत अभियानांतर्गत राबवण्यात अालेल्या पाणीपुरवठा याेजनेच्या जलवाहिनीतून पाणीपुरवठा करण्याचे नियाेजन केले जात आहे. पूर्वीप्रमाणे अपार्टमेंटमध्ये मागेल त्याला कनेक्शन दिल्यामुळे जलवाहिनीला ठिकठिकाणी छिद्रे पाडावे लागतील. त्यामुळे पाण्याचा दाब कमी हाेण्याची शक्यता आहे.

निर्णयाला विराेध सुरू झाल्याने त्यावर फेरविचार करण्यासाठी शुक्रवारी बैठक झाली. यावेळी महापाैर जयश्री महाजन, आयुक्त विद्या गायकवाड, उपमहापाैर कुलभूषण पाटील, विराेधीपक्षनेता सुनील महाजन, नितीन लढ्ढा, उपायुक्त प्रशांत पाटील, नगरसेविका शुुचिता हाडा, नगरसेवक कैलास साेनवणे, विशाल त्रिपाठी, दिलीप पाेकळे, नवनाथ दारकुंडे आदी उपस्थित हाेते.


पार्किंगच्या जागेत टाकी करून साठा करावा : शहरातील अनेक अपार्टमेंट हे जुने आहेत. त्या ठिकाणी संपुर्ण परिसर व्यापलेला आहे. त्यामुळे पार्किंगची जागा नसल्याने भूमीगत पाण्याची टाकी करता येणे शक्य नाही. अशा अपार्टमेंटमध्ये सहा नळ कनेक्शन दिले जाणार आहेत. तसेच ज्या ठिकाणी पार्किंगची जागा आहे तसेच बांधकाम परवानगी घेताना पाण्याची व्यवस्था नमूद केली आहे. अशा ठिकाणी मागणीनुसार एक अथवा दाेन कनेक्शन दिले जाणार आहेत. यावर महासभेत शिक्कामाेर्तब केले जाणार आहे.

मनपा मालकीच्या सागर पार्कवर कार्यक्रमासाठी भाडे निश्चित करण्यात आले आहेत. आता सागर पार्कवर लग्न साेहळा आयाेजीत करण्यासाठी दाेन लाख भाडे आकारले जाणार आहे. साफसफाईसाठी स्वतंत्र फी आकारली जाईल. याशिवाय सागर पार्कवर डीजेला बंदी घातली आहे. नागरिकांची तक्रार आल्यास पालिका डीजे जप्त करेल असाही महत्वपुर्ण निर्णय झाला. यावर पुढच्या महिन्यात महासभेत शिक्कामाेर्तब हाेईल.


गाेलाणी मार्केटमधील गाळ्यांचे हस्तांतरण परस्पर करण्यात आले आहे. पालिकेकडे मंजुरीसाठी दिलेल्या प्रस्तावावर निर्णय झाल्याने व्यावसायिकांनी आपसात व्यवहार केले हाेते. अशा गाळ्यांचे हस्तांतर नियमीत करून घेण्यात येणार आहे. यासाठी हस्तांतरण फी तसेच २५ हजार रूपयांचा दंड आकारला जाणार आहे.