जळगाव लाईव्ह न्यूज । ८ मे २०२३ । देशातील अनेक राज्यांमध्ये अवकाळी पावसाने धुमाकूळ घातल्याने शेतकऱ्यांच्या पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. या नुकसानीतून शेतकरी सावरत नाही तोवर आणखी एक नवीन संकट उभं ठाकलं आहे. मोचा चक्रीवादळ आज पश्चिम बंगालच्या उपसागरात धडकणार आहे. आज सोमवार आणि मंगळवारी ताशी 60 किलोमीटर वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे. याचा परिणाम देशातील अनेक राज्यांमध्ये कमी अधिक प्रमाणात पाहायला मिळणार आहे.
हवामान खात्याने (IMD) सांगितले की, चक्रीवादळाचा परिणाम जवळपासच्या राज्यांमध्ये दिसून येईल. याठिकाणी मध्यम स्वरूपाच्या पावसासह मुसळधार पावसाची शक्यता आहे. हवामान खात्याने मच्छीमार आणि बोटी चालकांसाठी अलर्ट जारी केला आहे. आग्नेय बंगालचा उपसागर आणि अंदमान समुद्र, आग्नेय आणि आसपासच्या मध्य बंगालचा उपसागर आणि अंदमान समुद्राकडे न जाण्याचा सल्ला देण्यात आला आहे, असे विभागाने म्हटले आहे.
या चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर हवामान विभागाने महाराष्ट्रासह इतर काही राज्यांना अलर्ट दिला आहे. महाराष्ट्रात पश्चिम महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये अति मुसळधार ते हलक्या स्वरुपाचा पाऊस राहण्याची शक्यता आहे. नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली, यवतमाळ या जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यासह पाऊस पडेल असा इशारा देण्यात आला आहे.
कोणत्या राज्यात पाऊस पडेल?
IMD नुसार, पुढील 24 तासांत हिमाचल, उत्तराखंड आणि जम्मू-काश्मीरच्या काही भागात पाऊस आणि हिमवर्षाव होऊ शकतो. त्याचवेळी महाराष्ट्रासह दिल्ली, राजस्थान, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, हरियाणा, पंजाब, आणि छत्तीसगडच्या काही भागात पावसाची शक्यता वर्तविण्यात आलेली आहे.