जळगाव लाईव्ह न्युज : १५ मे २०२४ : मे महिन्यातील तीव्र उकाडा व अवकाळीचा सामना करणाऱ्या नागरिकांसह शेतकऱ्यांना मान्सून देशासह महाराष्ट्रात कधी दाखल होईल याची उत्सुकता आहे. अशातच गतवर्षीच्या तुलनेत यंदा मान्सूनचे आगमन वेळेपूर्वी होण्याची शक्यता वर्तविली गेलीय. महाराष्ट्रात यंदा मान्सूनचे आगमन १० ते १२ जूनपर्यंत होण्याचा अंदाज हवामान विभागाकडून वर्तविण्यात आला आहे.

सध्या कन्याकुमारीच्या आसपास चक्रीवादळ स्थिती आहे, तसेच केरळ किनारपट्टीवर कमी दाबाचा पट्टा असून त्याचा आस मराठवाड्यापर्यंत आहे. ही परिस्थिती मान्सूनच्या आगमनासाठी पूरक असल्याची माहिती हवामान तज्ज्ञ माणिकराव खुळे यांनी दिली.

कशी घेणार एन्ट्री?
सध्याची स्थिती कायम राहिल्यास याच आठवड्यात म्हणजे १९ मेपर्यंत नैऋत्य मोसमी पाऊस देशाच्या महासागरीय क्षेत्रात म्हणजे बंगालच्या उपसागरात, इंडोनेशियाच्या पश्चिम किनारपट्टी तसेच सुमात्रा बेटापर्यंत धडक देण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
२८ मेपर्यंत केरळमध्ये
नैऋत्य मान्सून साधारणपणे एक जूनपर्यंत देशाच्या प्रवेशद्वाराजवळ म्हणजे केरळ राज्याच्या टोकावर हजेरी लावतो. मात्र, सध्या तयार झालेल्या परिस्थितीनुसार तो त्यापूर्वीच म्हणजे २७ ते २८ मेदरम्यान केरळ किनारपट्टीवर पोहोचण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यानंतर १० ते १२ दिवसांत तो अरबी समुद्रात व तिथून महाराष्ट्रात धडकेल, असा अंदाज आहे.
आज पावसाची शक्यता :
दरम्यान, राज्यात सध्या अवकाळी पावसाचा धुमाकूळ सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे. आज बुधवारी देखील राज्यातील अनेक जिल्ह्यांना पावसाचा इशारा देण्यात आला आहे. कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा व विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी विजेच्या कडकडाटासह हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता आहे. जळगावात देखील आज विजांच्या कडकडाट, वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता आहे.












