जळगाव लाईव्ह न्यूज । १६ ऑक्टोबर २०२५ । आगामी स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकाआधीच जळगाव जिल्ह्यात महायुती फिस्कटली असून पाचोरा-भडगावचे शिवसेना शिंदे गटाचे आमदार किशोर पाटील यांनी भाजपला आव्हान देत थेट उमेदवार जाहीर केले आहे. यामुळे स्थानिक स्वराज्यच्या निवडणुकीत उमेदवारी आणि जागावाटप दोन्हींमध्ये महायुतीत एकमत होण्याची शक्यता धूसर सर झाली आहे.

सुप्रीम कोर्टाने ३१ जानेवारी २०२६ पर्यंत राज्यातील प्रलंबित स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुका घेण्याचे आदेश दिल्यांनतर राज्यातील घडामोडीला वेळ आला आहे. यातच या निवडणुका महायुतीमधील घटक पक्ष युतीत लढणार की स्वबळावर याबाबत चर्चा सुरु आहे. मात्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत महायुती कायम राहील असे म्हटले आहे. तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही तीच भूमिका जाहीर केली आहे. प्रत्यक्षात मात्र महायुतीतील आमदार-मंत्र्यांना आता स्वबळाचे वेध लागले आहेत.

भाजपचे संकटमोचक असलेल्या जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी पडद्यामागे स्वबळाची तयारी केली आहे, असा आरोप महायुतीचेच मंत्री करीत आहेत. भाजप कार्यकर्त्यांच्या बैठकीत तसे संकेत दिले जात आहेत. त्यांच्या या भूमिकेमुळे शिवसेना एकनाथ शिंदे पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार दोघेही अस्वस्थ आहेत.
त्यातच शिंदे गटाचे आमदार किशोर पाटील यांनी देखील आपली भूमिका स्पष्ट करत आपण युतीच्या नव्हे तर आपल्या शिवसेना पक्षाच्या माध्यमातून स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका लढणार असल्याचा दावा केल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. त्यांच्या या दाव्याने जळगाव जिल्ह्यात महायुतीमध्ये पहिला मिठाचा खडा पडला आहे.
विशेष आमदार किशोर पाटील यांनी उमेदवारही जाहीर केले आहे. त्यानुसार भडगाव नगरपरिषद अध्यक्षपदासाठी त्यांनी रेखा प्रदीप मालवी तर पाचोरा नगराध्यक्षपदासाठी त्यांची माझी मुलगी किंवा पत्नी हे उमेवार असण्याची शक्यता आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी मंत्री अनिल पाटील यांनी देखील जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुका स्वबळावर करण्याचा कार्यकर्त्यांचा आग्रह असल्याचे म्हटले आहे. आम्ही त्याची तयारी करणार आहोत. वरिष्ठ नेत्यांची भूमिका काय आहे, याची वाट पाहणार आहोत. असं आमदार अनिल पाटील यांनी म्हटलं आहे.











