आम्ही तुमची फाईल फिरवली की..; मंत्री गुलाबराव पाटलांचा आमदार चव्हाणांना मिश्किल टोला !

सप्टेंबर 12, 2026 12:59 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । जळगाव जिल्हा पोलीस दलाच्या वतीने जिल्ह्यातील पोलीस पाटलांसाठी विशेष मेळावा व मार्गदर्शन कार्यशाळेचे भव्य आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमास जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील, वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे आणि ग्रामविकास व जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांची प्रमुख उपस्थिती लाभली. या मेळाव्यात मान्यवरांच्या हस्ते पोलीस पाटलांसाठी उपयुक्त ठरणाऱ्या विशेष ‘मार्गदर्शन पुस्तिके’चे शानदार अनावरण करण्यात आले.

gulabrao patil mangesh chavan

दरम्यान, यावेळी पोलीस पाटलांच्या मानधनवाढीच्या ‘फाईल’वरून राजकीय जुगलबंदी रंगल्याच पाहायला मिळाले. आमदार मंगेश चव्हाण, मंत्री गुलाबराव पाटील यांच्या मिश्कील वक्तव्यांनी कार्यक्रमात चांगलीच रंगत आली. मानधनवाढीचा मुद्दा गंभीर असला तरी फाईलच्या निमित्ताने झालेल्या या टोलेबाजीने उपस्थितांमध्ये हास्याचे वातावरण निर्माण झाले.

काय म्हणाले मंगेश चव्हाण?

आमदार मंगेश चव्हाण यांनी पोलीस पाटलांच्या मानधनवाढीची फाईल मंजूर करून घेण्यासाठी पाठपुरावा करण्याचे आश्वासन दिले. “माझं कामच फाईल घेऊन फिरण्याचं आहे. तुमची फाईल घेऊन फिरेल; मात्र काम झालं नाही तर मंत्री गिरीश महाजन आणि गुलाबराव पाटील हे दोघे जबाबदार असतील,” अशी मिश्कील टिप्पणी त्यांनी केली.

मंत्री गुलाबरा पाटलांचे खास शैलीत प्रत्युत्तर

चव्हाण यांच्या या वक्तव्यावर मंत्री गुलाबराव पाटील यांनी आपल्या खास शैलीत प्रत्युत्तर दिले. “पोलीस पाटलांना सर्व राजकारणी घाबरतात. त्यामुळे आमदार मंगेश चव्हाण फाईल का फिरवतात, हे आता माझ्या लक्षात आलं. आम्ही तुमची फाईल फिरवली की तुम्ही आमची फाईल फिरवता,” असा मिश्कील टोला गुलाबराव पाटील यांनी लगावला.

गुलाबराव पाटील यांच्या या वक्तव्याने कार्यक्रमस्थळी हास्याची लाट पसरली. पोलीस पाटलांच्या प्रश्नावर चर्चा सुरू असताना नेत्यांमधील या हलक्याफुलक्या संवादामुळे मेळाव्यातील वातावरण अधिक उत्साही झाले.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now