जळगाव लाईव्ह न्यूज । १८ जून २०२४ । महाराष्ट्रामध्ये नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत महायुतीला अपेक्षित यश मिळालं नाही. या पराभवाचे महायुतीमध्ये महामंथन सुरु अनेक भाजप नेत्यांनी त्यांच्या मतदार संघात कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांची कान उघडणी केली आहे. यातच जळगावमध्ये भाजपच्या कार्यालयात मंत्री गिरीश महाजन यांनी पदाधिकारी, कार्यकर्ते यांची शाळा भरवली. जळगाव लोकसभेतील उमेदवारांना पाहिजे तसं मताधिक्य न मिळाल्याने मंत्री गिरीश महाजन पदाधिकारी कार्यकर्त्यांवर नाराज आहेत. त्यांनी त्यांची नाराजी पदाधिकाऱ्यांसमोर व्यक्त केल्याची माहिती समोर येत आहे.
लोकसभा निवडणुकीत राज्यात भाजपला फक्त नऊ जागा मिळाल्या. गेल्या वेळी जिंकलेल्या २३ वरून संख्याबळ १४ ने घटले आहे. केंद्रासह राज्यात सत्ता स्थानी असतानाही जनादेश मिळविताना कोणती अडचण आली, कुठे कमी पडलो, जनता जर्नादनाचा आशीर्वाद का मिळाला नाही, याविषयीची समीक्षा सुरु आहे. बुथनिहाय कामगिरी तपासल्यानंतर पक्षातंर्गत अनेकांची खरडपट्टी काढण्यात आली आहे.
यातच जळगाव शहरातील जी एम. फाउंडेशन या संपर्क कार्यालयात मंत्री गिरीश महाजन यांनी तब्बल एक तास बंद दारा आड बैठक घेतली. यामध्ये त्यांनी भाजप पदाधिकाऱ्यांना फैलावर घेतल्याची माहिती समोर आली आहे. जळगाव लोकसभेच्या स्मिताताई वाघ यांना एकूण 3 ते साडे तीन लाख एवढे मताधिक्य मिळेल अशी मंत्री गिरीश महाजन यांची अपेक्षा होती. जळगाव शहरातूनही त्या त्या बुथवर पाहिजे त्या प्रमाणात मताधिक्य मिळाले नाही. काही भागात हक्काचा मतदार होता, तिथे पण मतांचा टक्का न वाढल्याने मंत्री गिरीश महाजन यांनी नगरसेवकांसह भाजपच्या पदाधिकाऱ्यांचे कान टोचले.
पुन्हा चूक झाल्यास पक्षातून हकालपट्टी
मताधिक्यामध्ये आणखी वाढ झाली असती मात्र अनेकांनी मनापासून काम न केल्याने मंत्री गिरीश महाजन यांनी भाजप पदाधिकाऱ्यांची कान उघडणी केली. आगामी निवडणुकांमध्ये अशा पद्धतीने चूक पुन्हा केल्यास पक्षातून बाहेरचा रस्ता दाखवण्याचा मंत्री गिरीश महाजन यांनी या बंद द्वार बैठकीत पदाधिकाऱ्यांना इशारा दिल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.