जळगाव लाईव्ह न्यूज । १५ एप्रिल २०२६ । जामनेर तालुक्यातील पळासखेडा येथे रस्त्यावर काचेच्या बाटल्या फोडणाऱ्या माथेफिरू तरुणाला मंत्री गिरीश महाजन यांनी आपल्या खास शैलीत अद्दल घडवली आहे. तरुणाला मंत्री महाजन यांनी स्वतः उभे राहून रस्ता झाडायला लावला. या अनोख्या शिक्षेची सध्या संपूर्ण जिल्ह्यात जोरदार चर्चा होत आहे.

नेमकी घटना काय?

मिळालेल्या माहितीनुसार, पळासखेडा येथील एका तरुणाने दारूच्या नशेत कोल्ड्रिंक्सच्या सुमारे २० ते २५ काचेच्या बाटल्या भररस्त्यात फोडल्या होत्या. यामुळे संपूर्ण रस्त्यावर काचांचा खच पडला होता. या प्रकारामुळे येणाऱ्या-जाणाऱ्या वाहनांचे टायर पंक्चर होत होते, तर पादचारी ग्रामस्थांना चालणेही कठीण झाले होते. या माथेफिरूच्या कृत्यामुळे संपूर्ण गाव हैराण झाले होते.
योगायोगाने मंत्री गिरीश महाजन एका कार्यक्रमानिमित्त पळासखेडा गावात आले होते. रस्त्यावरील काचा आणि ग्रामस्थांची होणारी गैरसोय पाहून गावकऱ्यांनी महाजन यांचा ताफा थांबवला आणि सर्व प्रकार त्यांच्या लक्षात आणून दिला. गिरीश महाजन यांनी गाडीतून उतरून परिस्थितीची पाहणी केली आणि संबंधित तरुणाला तत्काळ बोलावून घेतले.
गुन्हा करून उर्मटपणे वागणाऱ्या त्या तरुणाची नशा मंत्री महाजन यांनी क्षणार्धात उतरवली. त्याला पोलिसांच्या स्वाधीन करण्यापूर्वी मंत्र्यांनी त्याला झाडू आणायला सांगितला. “ज्या काचा तू फोडल्या आहेत, त्या आधी स्वतः स्वच्छ कर,” अशी कडक तंबी महाजन यांनी दिली. मंत्र्यांच्या आदेशापुढे त्या माथेफिरूचे काहीच चालले नाही. भररस्त्यात सर्वांच्या समोर त्या तरुणाने झाडू मारून सर्व काचा गोळा केल्या आणि रस्ता चकाचक केला.
रस्त्यावरील सर्व काचा स्वच्छ करून झाल्यानंतरच मंत्री गिरीश महाजन यांनी संबंधित तरुणाला पोलिसांच्या स्वाधीन केले. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे.











