मंत्री गिरीश महाजनांचे लोकसभा निवडणूक लढविण्याबाबत मोठं व्यक्तव्य. वाचा काय म्हणाले
जळगाव लाईव्ह न्यूज । ७ मार्च २०२४ । लोकसभा २०२४ च्या निवडणुकीसाठी भाजपने नुकतीच उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली असून मात्र या यादीत महाराष्ट्रातील एकाही उमेदवाराचा समावेश नाहीय. त्यामुळे राज्यासह जळगाव जिल्ह्यातील दोन्ही लोकसभा मतदारसंघातून कोणाला उमेदवारी मिळेल याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. दरम्यान यातच भाजपचे मंत्री गिरीश महाजन यांनी लोकसभा निवडणूक लढविण्याबाबत मोठं वक्तव्य केलं आहे.
पक्षाने सांगितले तर लोकसभा निवडणूक लढणार असल्याचं व्यक्तव्य गिरीश महाजन यांनी केलं आहे. मंत्री महाजनांच्या या वक्तव्याने राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं आहे. पक्षांनी लोकसभा निवडणुकीची जबाबदारी दिली तर स्वीकाराल का? असा प्रश्न मंत्री गिरीश महाजन यांना जळगावात पत्रकारांनी केला. त्यावर बोलताना गिरीश महाजन म्हणाले की, पक्षाने अजून मला लोकसभा निवडणूक लढवण्यासंदर्भात काहीही सांगितलेलं नाही.
मात्र पक्षाने सांगितलं निवडणूक लढा तर नक्कीच लोकसभेची निवडणूक लढेल आणि नका लढू सांगितलं तर नाही लढणार, संघ परिवारात काम करा असं सांगितलं तर संघ परिवारात काम करू. पक्षाने जो आदेश दिला तो मान्य असल्याची प्रतिक्रिया यावेळी मंत्री गिरीश महाजन यांनी दिली आहे.
दुसरीकडे चाळीसगाव येथील आयोजीत कार्यक्रमात शिंदे गटाचे मंत्री गुलाबराव पाटील यांनी देखील गिरीश महाजन यांच्याबाबत बोलताना म्हणाले की ते पुढे आता आमदार होतील की खासदार होतील ते माहीत नाही, आता अमित शाह येऊन गेले ते म्हणाले की, गिरीश भाऊ तुम दिल्ली चलो.. यामुळे मंत्री गिरीश महाजन यांचे नेमके काय होईल हे सांगता येत नाही, असं गुलाबराव पाटील म्हणाले.
दरम्यान, राज्यातील महायुतीमध्ये लोकसभेसाठी जागावाटपाचा तिढा अद्यापही सुटला आहे. मात्र यात भाजप 32 जागा लढवण्यावर ठाम आहे, पण या 32 जागांपैकी काही जागांवर शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस काही जागांवर आग्रही आहे. लवकरच जागावाटपाचा तिढा सुटणार असून यामुळे लवकरच राज्यातील भाजप लोकसभा उमेदवारांची यादी जाहीर करू शकतो.