जळगाव लाईव्ह न्यूज । विनोद कदम । अमळनेर तालुक्यातील वाघोदे येथे शुक्रवारी मापात पाप करणाऱ्या व्यापाऱ्याला ग्रामस्थांनी रंगेहात पकडले. संबंधिताला ५० हजारांचा दंड करून सोडून देण्यात आले. पोलिसांत या घटनेची नोंद नव्हती.
शुक्रवारी सकाळी ११ वाजेच्या दरम्यान संशयित व्यापारी हातकाटा आणि वाहन घेऊन, कापूस खरेदीसाठी गावात आला. प्रतिक्विंटल साडेआठ हजार रुपये भावाने कापूस खरेदी करेल, असे त्याने ग्रामस्थांना सांगितले. काही शेतकऱ्यांनी त्याला कापूस देण्याचे ठरवले. हात काट्यावर आणि व्यापाऱ्यावर विश्वास ठेवून शेतकऱ्यांनी कापूस मोजणीला सुरूवात केली. गावातील शेतकरी भारतीबाई रामकृष्ण पाटील यांचा कापूस संशयित व्यापारी मोजत होता. तर गावातीलच रावसाहेब पाटील हे देखील त्या ठिकाणी उपस्थित होते. कापूस मोजताना काट्यावर वजनाची कमी नोंद दाखवली जाते, असा संशय पाटील यांना आला. त्यांनी यापुर्वी मोजलेला कापूस कमी भरत असल्याचे लक्षात येताच, शेतकऱ्यांनी व्यापाऱ्याला जाब विचारला. गावातील तरुण घटनास्थळी जमल्यावर, संशयित व्यापाऱ्याने हात जोडून माफी मागितली. संबंधित व्यापारी क्विंटलमागे दोन ते तीन किलो वजन जास्तीचे मोजत होता.
दरम्यान, गावातील संतप्त तरुणांनी व्यापाऱ्याला चोप देण्याचा प्रयत्न केला. मात्र, सरपंच चेतन पाटील, जयप्रकाश पाटील, किर्तीलाल पाटील, संभाजी पाटील, रावसाहेब पाटील, सतीश पाटील, चतूर पाटील यांच्यासह अन्य ग्रामस्थांनी सामंजस्याची भूमिका घेत व्यापाऱ्याकडे ओळखपत्र मागितले. त्यातही त्याने लपवाछपवी केली. त्याने गावाचे नाव चुकीचे सांगितले. अखेर व्यापाऱ्याला ५० हजार रुपये दंड करण्यात आला.
हे देखील वाचा :
- विजेचा जोरदार धक्का बसल्याने महिलेचा मृत्यू ; अमळनेरची घटना…
- चिंता वाढवणारी बातमी! जळगावातील अनेक भागात भूगर्भातील पाणीपातळी घटली…
- जळगावला स्टार्टअप हब बनविणार : स्मिताताई वाघ यांची जळगाव स्टार्टअप ग्रृपसोबत ‘स्टार्टअप पे चर्चा’
- अमळनेर तालुक्यात होळीच्याच दिवशी घडली दुर्दैवी घटना
- Amalner : झोपडीला लागलेल्या आगीत 19 बकऱ्यांचा होरपळून मृत्यू