⁠ 
शनिवार, एप्रिल 13, 2024

Amalner : झोपडीला लागलेल्या आगीत 19 बकऱ्यांचा होरपळून मृत्यू

जळगाव लाईव्ह न्यूज | 15 मार्च 2024 | अमळनेर तालुक्यातून एक दुर्दैवी घटना समोर आलीय. झोपडीला आग लागल्याने १९ बकऱ्यांचा होरपळून मृत्यू झाला. ही घटना झाडी येथे शुक्रवारी १५ मार्च रोजी मध्यरात्री २.३० वाजता घडली असून यात तीन लाखांचे नुकसान झाले आहे.

अमळनेर तालुक्यातील झाडी येथे शिवदास यादव भिल हे आपल्या कुटुंबासह वास्तव्याला असून ते शेळी पालन करून ते आपला उदरनिर्वाह करतात. घराच्या मागील बाजूस असलेल्या झोपडीत बकऱ्या बांधलेल्या होत्या. शुक्रवारी १५ मार्च रोजी मध्यरात्री अडीच वाजेच्या सुमारास झोपडीला अचानक आग लागली. आग लागल्याचे लक्षात आल्यानंतर शिवदास भिल यांनी आरडाओरड केल्याने परिसरातील गावकऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली.

त्यानंतर अमळनेर नगरपरिषदेचे मुख्याधिकारी तुषार नेरकर यांना घटना कळवताच त्यांनी अग्निशमन बंब पाठविलाा. अग्निशमन दलप्रमुख दिनेश बिऱ्हाडे , फारुख शेख, आनंदा झिम्बल यांनी आग विझवली. मात्र तोपर्यंत उशिर झाला होता. तब्बल १९ शेळ्यांचा होरपळून मृत्यू झाला आहे. यात शिवदास भिल यांचे सुमारे ३ लाखांचे नुकसान झाले आहे. या घटनेबाबत मारवड पोलीसात नोंद घेण्याचे काम सुरू होते.