⁠ 
गुरूवार, मार्च 28, 2024

काळजी घ्या..! मुलांमध्ये ‘हा’ संसर्गजन्य रोग पसरतोय ; जाणून घ्या लक्षणे

जळगाव लाईव्ह न्यूज । १५ नोव्हेंबर २०२२ । वातावरणातील बदलानुसार अनेक आजार डोकेवर काढतात. मुंबईत सध्या गोवरचा उद्रेक सुरु असून ‘गोवर’ (Measles) हा आजार एका विषाणूमुळे होतो जो सहज पसरतो. हा आजार मुलांसाठी गंभीर आणि घातक मानला जातो. याला अनेक ठिकाणी ‘रुबेला’ असेही म्हणतात. तुम्हाला गोवरच्या लक्षणांची पूर्ण माहिती असणे आवश्यक आहे. जेणेकरून वेळेवर प्राथमिक उपचार घेणे सोईचे होऊ शकते.   

WHO च्या म्हणण्यानुसार, भारतात गोवरचे रुग्ण दिवसेंदिवस वाढत आहेत. सन 2022 मध्ये सप्टेंबर महिन्यात देशात गोवरचे 11 हजार 156 रुग्ण आढळले होते. गेल्या वर्षीच्या तुलनेत ७९ टक्के वाढ झाली आहे. सर्वात आश्चर्याची बाब म्हणजे 2022 मध्ये गोवरचे रुग्ण अवघ्या दोन महिन्यांत दुप्पट झाले आहेत.

गोवर म्हणजे काय?
गोवर एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे वेगाने पसरतो. तो प्रथम कोणत्याही व्यक्तीच्या श्वसनसंस्थेवर हल्ला करतो. औषध आणि लसीकरणाने हा आजार टाळता येतो. जगभरातील मृत्यूच्या प्रमुख कारणांपैकी एक म्हणजे ‘गोवर’ हा आजार. WHO च्या म्हणण्यानुसार, 2017 मध्ये संपूर्ण जगात सुमारे 1 लाख 10 हजार लोकांचा मृत्यू केवळ गोवरमुळे झाला. त्यापैकी बहुतेक मुले (Child) होती आणि त्यांचे वय 5 वर्षांपेक्षा कमी होते.

सध्या मुंबईत गोवरचा उद्रेक सुरु आहे. दिवसेंदिवस गोवरचा प्रादुर्भाव वाढत आहे. मुंबईत गोवरचा प्रादुर्भाव कशामुळे झाला याचा तपास करण्यासाठी केंद्र सरकारकडून तीन सदस्यीय पथकाची स्थापना करण्यात आली आहे. सीडीसीच्या म्हणण्यानुसार, गोवर हा लहान मुलांसाठी अत्यंत धोकादायक संसर्ग असल्याचे सिद्ध होऊ शकते. 4 प्रमुख लक्षणे एक्सपोजरनंतर 7 ते 14 दिवसांत दिसतात.

गोवरची सुरुवातीची लक्षणे
जेव्हा संक्रमित मुलामध्ये गोवरची सुरुवातीची लक्षणे दिसतात तेव्हा 2 ते 3 दिवसांनंतर तोंडात लहान पांढरे डाग तयार होतात. त्याच वेळी, 3 ते 5 दिवसात शरीरावर लाल-चपटे पुरळ दिसू लागतात. गोवरची पुरळ मुलाच्या चेहऱ्यावर, मानांवर, खोडावर, हातांवर, पायांवर आणि तळव्यांना येऊ शकतो.

​गोवर झाल्यानंतर काय करावे?

NHS नुसार, जर एखाद्या मुलास गोवरचे निदान झाले असेल तर खालील उपायांचा अवलंब करा.

आराम करू द्या
संक्रमित मुलाजवळ दुसरं मुलाला जाण्यास टाळावे
पाणी आणि रस प्या.
मुलाचे शरीर ओल्या कापसाने स्वच्छ करा.
तापाचे औषध डॉक्टरांच्या सल्ल्याने द्यावे.
आपल्या स्वच्छतेची काळजी घ्या.
बाळाला स्पर्श करण्यापूर्वी आणि नंतर हात चांगले धुवा.

​गोवर प्रतिबंध आणि उपचार
गोवर टाळण्याचा एकमेव मार्ग म्हणजे लसीकरण करणे. मुलांना गोवरपासून वाचवण्यासाठी त्यांना गोवर लसीचे 2 शॉट दिले जातात. कारण गोवरवर अद्याप कोणतेही औषध नाही. गोवर झाल्यानंतर केवळ त्याची लक्षणे नियंत्रित करून उपचार केले जातात.