⁠ 
शुक्रवार, एप्रिल 19, 2024

जळगावच्या राजकारणात मराठा नेतृत्वाची फरपट…

जळगाव लाईव्ह न्यूज । दिलीप तिवारी । जळगाव महानगर पालिकेतील सत्तांतराचा धुराळा खाली बसला. मराठा समाजातील उमेदवाराला उपमहापौरपदावर समाधान मानावे लागले. नगरसेवकांच्या फाटाफुटीत सर्वाधिक अविश्वसनीय स्थिती मराठा नगरसेवकांची राहिली. इतरही मराठा नेतृत्वाची जवळपास अशीच अवस्था आहे. अलिकडच्या काही वर्षांत जिल्ह्यातील सत्तेच्या पदांवरून मराठा समाजातील नेतृत्वाला खड्यासारखे बाहेर काढले गेले. कधीकाळी जळगाव जिल्ह्याच्या राजकारणावर, मंत्रीपदांवर तसेच जिल्हा बँक, जिल्हा दूध संघ, साखर कारखाने व सुतगिरण्या यात मराठा समाजातील नेत्यांचे वर्चस्व होते. तेथून मराठा नेतृत्वाला ठरवून विस्थापित केले गेले. सध्याचे मराठा नेते हे सुद्धा स्वतःचे ताट घेऊन स्वतःची पंगत सुरू करु शकतील अशा ताकदीचे नाहीत. दुसऱ्याच्या ताटाखालचे मांजर होऊन दुसऱ्याच्या पंगतीत जेवायची सवय त्यांना लागली आहे.

जळगाव मनपातील सत्तांतराने मराठा नेतृत्वाच्या फरपटचा इतिहास अधिकच गडद झाला. वास्तविक भाजपतर्फे पहिला मराठा महापौर होण्याची संधी प्रतिभा कापसे किंवा ज्योती चव्हाण यांना लाभलेली होती. मात्र जिल्ह्यातील अत्यंत वजनदार व प्रभावी नेत्याने मुख्यमंत्री, नगर विकास मंत्री, शिवसेना खासदार वगैरेंना कॉल करून जळगाव मनपातील भाजप फोडली. तशा अनेक बातम्या सोशल मीडिया व छापील माध्यमात आलेल्या आहेत. भाजप फोडण्याचा परिणाम असा झाला की, महापौर होऊ शकणाऱ्या मराठा उमेदवाराची संधी हुकली. शिवाय, नेत्यांच्या दबावामुळे भाजपकडील इतर नगरसेवक फुटून शिवसेनेकडे गेले. त्यातील काही मराठा नगरसेवकांवर अविश्वसनीय नगरसेवक असा ठपका लागला.

शिवसेनेडून महापौरपदाचे उमेदवार निश्चित होते. ज्या ९ ग्रह मंडळ नगरसेवकांनी सर्वांत अगोदर भाजपच्या सत्तेला सुरूंग लावायचे ठरविले त्यापैकी कुलभूषण पाटील यांना उपमहापौर करण्याचे निश्चित होते. पाटील हे मराठा आहेत. पण ऐनवेळी कुलभूषण पाटील यांच्या नावालाही विरोध सुरू झाला. मावळते उपमहापौर यांचे नाव लावून धरले गेले. भाजपमधील फोडाफोडीत जळगाव मनपातील मराठा नगरसेवकांचे राजकारण ‘ना इकडचे ना तिकडचे’ झाले. विधानसभा मतदार संघात शिवसेना बंडखोर व राष्ट्रवादी काँग्रेस पुरस्कृत मराठा उमेदवाराच्या विजयाचा असाची एक वचपा काढला गेला.

जळगाव शहरात मराठा राजकारणाचे खच्चीकरण व फरपट कशी होत आहे ? हे थोडे आकडेवारीवरून समजून घेऊ या. भाजपने यावेळी महापौरपद मराठा उमेदवाराला देणे निश्चित केले होते. भाजपकडे एकूण ११ मराठा नगरसेवक होते. त्यापैकी कापसे वा चव्हाण यांना उमेदवारी मिळणार होती. पण आमदार सुरेश भोळे यांच्याविषयी ९ ग्रह मंडळातील नगरसेवकांसह इतरांची असलेली नाराजी आणि कापसेंवर भोळे समर्थक असल्याचा शिक्का यामुळे बहुतेक नगरसेवक कापसे यांच्या नावाला विरोध करीत होते. खासदार उन्मेष पाटील यांनीही कापसेंच्या नावाला लावून धरले. भाजपतील एक मोठा गट आतून अस्वस्थ होता. कापसे नावाला एवढा विरोध होता की, महापौरपदासाठी विचार होणाऱ्या चव्हाण यांनीही ऐनवेळी भाजप सोडली. त्यांच्या सह भाजपतील ९ मराठा नगरसेवक स्वतंत्र गटात गेले.

जळगाव नगरपालिकेत सुरेशदादा जैन यांचे नेतृत्व असताना गुलाबराव देवकर व स्व. पुष्पलता प्रकाश पाटील यांना नगराध्यक्ष होण्याची संधी मिळाली होती. सुरेशदादा जैन यांनी सत्तेचे वाटप नेहमी सामाजिक संख्याबळ लक्षात घेऊन केले. जेव्हापासून महानगरपालिका अस्तित्वात आली तेव्हापासून एकही मराठा नगरसेवक महापौर होऊ शकलेला नाही. अशा राजकारणामागील कारणे दूरदृष्टीने तपासायला हवीत. त्याचे संभावित गणित आगामी विधानसभा २०२४ च्या निवडणुकीत दडलेले आहे.

जळगाव मतदार संघातून दोन वेळा (२०१४/२०१९) लेवा पाटील उमेदवार विजयी झाले. आता सन २०२४ मध्ये पुन्हा लेवा पाटीलच आमदार हवा असेल तर मराठा नेतृत्वाची जेवढी फाटापूट करता येईल तेवढी करायला हवी. कारण सन २०१९ च्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस दिलेले नवखे मराठा उमेदवार अभिषेक पाटील यांना फारसा प्रचार न करता ४९ हजारावर मतदान झालेले आहे. जर मराठा उमेदवार मतदारांना परिचित असेल, मराठा कार्ड सूत्र वापरले जाणार असेल तर जळगाव शहराचे नेतृत्व सहज मराठा आमदाराकडे जाऊ शकते. तसे झाले तर लेवा कार्ड आणि संभावित उमेदवारी धोक्यात येण्याचा इशारा आहे. तरीही जळगाव शहरात मराठा उमेदवार नाकारून इतर समाजाचा उमेदवार राष्ट्रवादी काँग्रेसकडून द्यायचा तर शरद पवार व अजीत पवार यांना तसे पटवून द्यावे लागेल. त्याची पार्श्वभूमी तयार करण्यासाठीच महापौर व उपमहापौर निवडणुकीत ठरवून मराठा नगरसेवकांचे खच्चीकरण झाले असावा असा निष्कर्ष काढायला जागा आहे.

सन २०१९ च्या विधानसभा निवडणुकीचा विचार केला तर तेव्हा शहरातल्या मतदारांची संख्या सुमारे ३ लाख ६५ हजार होती. यात सर्वाधिक मतदार हे मराठा समाजाचे म्हणजेच सुमारे ९४ हजार आहेत. असे असतानाही अभिषेक पाटील यांना ४९ हजार मते मिळाली. जळगाव शहरात मराठा पाठोपाठ लेवा पाटीदार मतदार संख्या सुमारे ८६ हजार आहे. परंतु, जळगाव शहर मतदार यादीत नाव असलेला लेवा पाटील मतदार पुणे-मुंबईकडे गेलेला आहे. अशी मतदारांची संख्या ११ हजारच्या वर आहे. तरीही जळगाव शहरातून लेवा पाटील उमेदवार समाजाचे गठ्ठा मतदान घेऊन विजयी होतो. अर्थकारणाच्या बळावर इतर समाजाचेही मतदान मिळवतो. त्यामुळेच शहराचा आमदार लेवा पाटील आणि महापौरपदावरही लेवा पाटील हे भाजप नेतृत्वाला हताशपणे करावे लागले होते.

लेवा पाटील मतदार खालोखाल ५२ हजार मुस्लिम आहेत. त्यातील मेहरूण व तांबापूर भागात समाजाने एकी दाखवून एमआयएमचे ३ नगरसेवक विजयी करून दाखवले. खरे तर असा धडा मराठा समाजाने गिरवायला हवा. जळगाव शहरात ३६ हजार गुजराती-मारवाडी, ३२ हजार कोळी व १२ हजार सिंधी समाजाचे मतदार आहेत. दलित व ओबीसी मानला जाणारा ४८ हजार मतदार आहे. कोळी समाजाचे मतदान ४० हजार सुद्धा नसताना मनपातील पदांवर या समाजातील नगरसेवकांची सहज वर्णी लागते. याचे कारण शहरातून प्रभाग निहाय निवडून येणाऱ्या नगरसेवकात लेवा पाटील समाजाच्या लेवा पाटील नगरसेवकांची संख्या क्रमांक १ वर म्हणजे १८ असते आणि कोळी समाजातील नगरसेवकांची संख्या क्रमांक २ वर म्हणजे १२ असते. शहरातील एकूण मतदार संख्या लक्षत घेतली तर जळगाव मनपात मराठा नगरसेवकांची संख्या सर्वाधिक असायला हवी. पण ती ११ आहे. या तुलनेत ९ मुस्लिम नगरसेवक आहेत.

सन २०१८ च्या मनपा निवडणूकीत भाजप व शिवसेनेकडून उमेदवारी देताना अनेक होतकरु मराठा तरुणांना बाजूला सारले गेले. राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेस या दोन्ही पक्षांची स्थिती निवडणूक लढविण्यासारखी नव्हतीच. त्यामुळे या दोन्ही पक्षात मराठा समाज हाच केडर बेस असलेल्या उमेदवारांचा भ्रमनिरास झाला. भाजप व शिवसेनेतून निवडणून येणार्‍या लेवा पाटील व कोळी समाजातील नगरसेवकांची संख्या कायम राहिली. सन २०१८ च्या मनपा निवडणुकीत प्रभागातील मतदार संख्येपेक्षा ‘रुपये वाटप’ हा घटक महत्त्वाचा ठरला. त्यामुळे ज्या प्रभागात मराठा बहुल मतदार होते तेथेही होतकरु मराठा उमेदवारांचा पराभव झाला. ७५ पैकी भाजप ५७ जागा मिळवून सत्ताधारी ठरला. महापौरपद पहिल्यांदा लेवा पाटील व आमदारांच्या पत्नी सौ.सीमा भोळे यांना मिळाले. दुसर्‍यावेळी कैलास सोनवणे यांच्या पत्नी सौ. भारती सोनवणे यांना मिळाले. तिसर्‍यावेळी भाजपने मराठा उमेदवार दिला. पण पक्ष फुटला. मराठा व महापौर होण्याची संधी हुकली.

मराठा समाजातील सर्व पक्षिय नेत्यांनी, गट-तटाने एकत्र येऊन मराठा खच्चीकरण आणि फरपट यावर चिंतन करण्याची गरज आहे. गावातील गल्लीबोळात आजही मराठा कुटुंबाला गल्लीचा प्रमुख मानले जाते. शहराच्या राजकारणातही सामाजिक संख्येचा विचार केला जातो. मात्र निवडणुकीच्या राजकारणात मराठा प्रभावाचे गणित आता मोडकळीस आले आहे. अर्थात याला काही अंशी घाबरलेले, दबून असलेले प्रस्थापित मराठा नेतृत्व कारणीभूत आहे. अशा नेतृत्वाचे काय करायचे ? हे मराठा समाजानेच ठरवायला हवे…

– दिलीप तिवारी, जेष्ठ पत्रकार