पाचोऱ्याच्या जवानाकडे ५० हजारांची खंडणी मागणाऱ्या खंडणीबहाद्दर जेरबंद

जून 2, 2026 11:32 AM

जळगाव लाईव्ह न्यूज । जमीन खरेदी-विक्री व्यवहारात मध्यस्थी केल्याचा दावा करत सैन्य दलातील जवान व त्यांच्या वयोवृद्ध वडिलांकडे ५० हजार रुपयांची खंडणी मागून जीवे मारण्याची धमकी दिल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी भोजे (ता. पाचोरा) येथील नीलेश नामदेव उबाळे याच्याविरोधात पिंपळगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून न्यायालयाने त्याला तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.

kulbhushanpatil firing case arrest

काय आहे प्रकरण?

भोजे येथील रहिवासी आणि सध्या सैन्य दलात कार्यरत असलेले जवान विलास बाबूलाल जाधव यांनी याप्रकरणी १ जून रोजी पिंपळगाव पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. फिर्यादीनुसार, भोजे शिवारातील एका प्लॉटच्या खरेदी-विक्री व्यवहारात आरोपी नीलेश उबाळे याचा काहीही संबंध नव्हता. तरीही त्याने आपण या व्यवहारात मध्यस्थी केल्याचा दावा करत जवान विलास जाधव यांच्याकडे ५० हजार रुपयांची मागणी केली. जाधव यांनी ही रक्कम देण्यास स्पष्ट नकार दिला. याचा राग आल्याने आरोपी उबाळे याने त्यांच्या मोबाईलवर वारंवार संपर्क साधून अत्यंत हीन दर्जाची शिवीगाळ केली आणि जीवे मारण्याची धमकी दिली.

मोबाईल रेकॉर्डिंग ठरले मुख्य पुरावा

संशयित आरोपी नीलेश उबाळे याने फोनवर केलेल्या शिवीगाळ आणि धमक्यांचे संपूर्ण संभाषण जवान विलास जाधव यांनी आपल्या मोबाईलमध्ये रेकॉर्ड केले होते. हा भक्कम ऑडिओ पुरावा जाधव यांनी पोलिसांकडे सुपूर्द केला आहे, ज्यामुळे पोलिसांना तातडीने कारवाई करणे सोपे झाले.

आरोपीने तक्रारीतून तडजोडी केल्याची चर्चा

नीलेश उबाळेविरुद्ध विविध शासकीय कार्यालये, मुख्यमंत्री कार्यालयाकडे तक्रारी व माहिती अधिकार अर्जाच्या माध्यमातून दबाव निर्माण करून प्रकरणांमध्ये तडजोडी केल्याचे आरोप आहे. अजून काही व्यक्तींकडून खंडणीच्या तक्रारी दाखल होण्याची शक्यता आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now