बातम्यामहाराष्ट्र

वाल्मिक कराडवर अखेर मकोका; कोर्टात नेमकं काय झालं?

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । १४ जानेवारी २०२५ । बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख (Santosh Deshmukh) हत्या प्रकरणात वाल्मिक कराडच्या (Valmik Karad) अडचणीत आणखी वाढ झाली आहे. आज वाल्मिक कराडवर मकोका (महाराष्ट्र संगठित गुन्हे अधिनियम) लागू करण्यात आला आहे.

खरंतर वाल्मिक कराडला 14 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली होती. त्याची मुदत आज संपली आहे. त्यानंतर आज बीडच्या केज न्यायालयात वाल्मिक कराडला हजर करण्यात आलं होतं. यावेळी केज न्यायालयानं महत्वपूर्ण निर्णय दिला आहे. त्याच्यावर मकोका लावण्यात आला आहे. तसेच त्याला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली.

नेमकं काय झालं कोर्टात?
आज न्यायालयात सुनावणीला सुरुवात होताच तपास अधिकारी अनिल गुजर यांनी वाल्मिक कराडची दहा दिवसाची पोलीस कस्टडी मागितली होती. व्हाईस सॅम्पल घेतला गेला आहे. तीन मोबाईल वाल्मीक कराड यांचे जप्त केले आहेत. संपत्ती कोणत्या गुन्ह्यातून कमावली आहे का हे तपासायचे म्हणून पीसीआर हवा आहे, असं तपास अधिकारी अनिल गुजर म्हणाले. भारतात अथवा भारताबाहेर काही संपत्ती आहे का?, याचा तपास करायचा आहे, असं तपास अधिकारी अनिल गुजर म्हणाले होते. दरम्यान, संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणात त्याचा ताबा मिळवण्यासाठी सीआयडीने कोर्टासमोर अर्ज दाखल केला आहे.

यावेळी वाल्मिक कराडचे वकील सिद्धेश्वर ठोंबरे यांनी युक्तिवाद करताना म्हटले की, “सीआयडी कोठडी न देता न्यायालयीन कोठडी द्या. सगळा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे. संपत्तीची माहिती घेण्यासाठी पोलीस कोठडी का?”

दरम्यान, वाल्मिक कराडला आज बीड जेलमध्ये नेलं जाणार आहे. न्यायालयीन कोठडीमध्ये ठेवलं जाईल. त्यानंतर उद्या मकोका अंतर्गत ताब्यात घेऊन केज जिल्हा व सत्र न्यायालयात हजर केले जाणार आहे. पण आता सेशन कोर्टामध्ये सीआयडीने अर्ज केला आहे, कदाचित सीआयडी त्यांना आज सुद्धा हजर व्हा असं म्हणू शकते.

परळी बंदची हाक
दरम्यान, वाल्मिक कराड याला मकोका लागल्यानंतर समर्थक आक्रमक झाले. त्यांनी सकाळपासूनच तीव्र आंदोलन केले होते. समर्थक आता आक्रमक झाले आहे. त्यांनी परळी बंदची हाक दिली आहे. आज वाल्मिक कराड यांच्या आईने सुद्धा पोलीस ठाण्याबाहेर त्यांना सोडवे यासाठी ठिय्या आंदोलन केले. शहरातील विविध दुकानं आणि आस्थापनं बंद करण्यात आली आहे. परळीचे सर्व व्यवहार हे ठप्प झाले आहेत.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Related Articles

Back to top button