⁠ 
शुक्रवार, एप्रिल 19, 2024

सत्ता वाचवण्यासाठी एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्री करा – शरद पवार

जळगाव लाईव्ह न्यूज । २२ जून २०२२ । एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री करा, असा सल्ला उद्धव ठाकरे यांना देण्यात आला आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांनी एकनाथ शिंदेना मुख्यमंत्रीपद देण्याचा सल्ला उद्धव ठाकरे यांना दिला असल्याचे म्हटले जात आहे. वर्षा बंगल्यावर शरद पवार आणि मुख्यमंत्री यांच्यात बैठक झाली.त्यात हि चर्चा झाल्याचे कळते.

शिवसेनेत सध्या उभी फूट पडली असून नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे विरोधात उद्धव ठाकरे असे चित्र सध्या पाहायला मिळत आहे. एकनाथ शिंदे यांच्यासोबत सुमारे ४६ आमदार गुवाहाटी येथे दाखल झाले असल्याचे म्हटले जात आहे. शिंदे यांचे बंड मोडून काढण्यासाठी शिवसेनेकडून प्रयत्न सुरु होते. बंडखोरांना पुन्हा बोलाविण्यासाठी शिवसेनेचे मुख्य प्रतोद सुनील प्रभु यांनी एक पत्र शिवसेनेच्या सर्व आमदारांना पाठवलं होते. पत्रकात सर्व आमदारांना ५ वाजेपर्यंत मुंबईत येण्याचे आदेश देण्यात आले होते. दरम्यान, एकनाथ शिंदे यांनी ट्विट करीत शिवसेना प्रतोदांनी काढलेला व्हीप बेकायदेशीर असल्याचे त्यांनी म्हटले आहे. तसेच नवीन प्रतोदपदी भरत गोगावले यांची नियुक्ती केली आहे. शिंदे यांनी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांचा वेळ मागितल्याचे वृत्त समोर येत असून सोबत असलेल्या आमदारांना ऑनलाईन पद्धतीने दाखविण्यासाठी वेळ मागितल्याचे समजते. यावर शरद पवार यांनी हा सल्ला दिला असल्याचे कळले.

मात्र त्या आदी काल म्हणजेच मंगळवारी एकनाथ शिंदे व उद्धव ठाकरे यांच्या मधील फोनवर चर्चा झाल्याची बातमी समोर आली होती. शिंदे यांच्याशी चर्चा करताना शिंदे यांनी ठाकरे यांना सांगितले होते कि, मला मंत्रिपद नको आहे. पण भाजपा सोबत युती करा अशी मागणी एकनाथ शिंदे यांनी केली होती. यामुळे पुढे काय होते ? हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.