बनावट नोटांच्या कारखान्यावर पोलिसांचा छापा; एकाला अटक

जळगाव लाईव्ह न्यूज । २० मे २०२२ । बनावट नोटांची छपाई करत असलेल्या कारखान्यावर पोलिसांनी छापा टाकून बनावट नोटा प्रिंट करण्याची सामग्री जप्त केली. या प्रकरणी एकाला अटक करण्यात आली. हा धक्कादायक प्रकार जामनेर तालुक्यात घडला. या प्रकरणी पहूर पोलिसांत गुन्हा दाखल झाला.

तालुक्यातील हिंगणे येथील रहिवासी असणारा उमेश चुडामण राजपूत (वय २२) हा काल रात्रीच्या सुमारास पहूर बस स्थानक परिसरात संशयास्पद पध्दतीत फिरत होता. यामुळे पोलिसांनी त्यांची विचारपूस करून झडती घेतली. यात त्याच्याकडे दोनशे रूपयाची एक बनावट नोट आढळून आली. यामुळे पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन सखोल चौकशी सुरू केली. दरम्यान, उमेश राजपूत याने आपण दोनशेच्या बनावट नोटांची आपल्या घरीच छपाई करत असल्याची माहिती दिली. त्यानुसार पोलिसांनी त्याच्या घरी रात्री उशीरा छापा टाकून बनावट नोटा प्रिंट करण्याची सामग्री जप्त केली. यात दोनशेच्या २३ बनावट नोटा आणि प्रिंटर व शाई आदी सामग्रीचा समावेश होता.