जळगाव लाईव्ह न्यूज । २८ जून २०२३ । मराठवाड्यातून खान्देशला जोडण्यात येणाऱ्या जालना – जळगाव या नवीन ब्रॉडगेज रेल्वे मार्गासाठीच्या खर्चास राज्य सरकारच्या आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत मंजुरी देण्यात आली आहे. एकूण ३ हजार ५५२ कोटी या नवीन रेल्वे मार्गाला देण्यात आहे. यामुळे आता रेल्वेने जळगावातून जालना गाठता येणार असून औद्योगिक विकासासह, व्यापार, दळणवळण, शेती, लघुउद्योग आणि पर्यटन विकासाला चालना मिळणार आहे.
केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी जालना-जळगाव नवीन रेल्वेमार्गाची घोषणा केली होती. त्यानंतर गेल्या नऊ ते दहा महिन्यापूर्वी जालना-जळगाव रेल्वेमार्गाचा अंतिम सर्व्हे तयार करण्यात आला होता.जालना ते जळगाव हा 174 किलोमीटर लांबीचा मार्ग असणार आहे या मार्गावर जगप्रसिद्ध अजिंठा लेणीचेठिकाण आणि मराठवाड्याचे आराध्य दैवत राजूरचा गणपती हेदेखील रेल्वेशी जोडले जाणार आहे.
जालना ते जळगाव हा रेल्वेमार्ग जालना, पिंपळगाव, पांगरी, राजूर, भोकरदन, सिल्लोडमार्गे गोळेगाव, अजिंठा, फर्दापूर, जळगाव पर्यंत जाणार आहे. दरम्यान, आज राज्य सरकारची मंत्रिमंडळ बैठक पार पडली. यात जालना ते जळगाव नवीन ब्रॉडगेज रेल्वे मार्गासाठी ३५५२ कोटी खर्चास मंत्रीमंडळाने मान्यता दिली