जळगाव लाईव्ह न्यूज : ३० मे २०२३ : शेतकर्यांकडे अद्यापही २०२२च्या खरीप हंगामातील कापूस पडून आहे. मे महिना संपत आल्याने खरिपाच्या तयारीसाठी शेतकर्यांनी अखेर कंटाळून कापूस विक्रीस काढला आहे. खरीप हंगामासाठी शेतकर्यांनी तयारी सुरू केली आहे. यामुळे आता बियाणे, खते, मजुरीसाठी पैसे लागतील. यामुळे शेतकर्यांनी कापूस विकण्यास सुरवात केली आहे. कापसाला गत वर्षा प्रमाणे यंदाही भाव मिळेल या आशेपोटी मागील सात महिन्यांपासून घरात सांभाळलेल्या पांढर्या सोन्याचे दर महिनाभरातच तब्बल दीड हजाराने कोसळल्यानं शेतकरी हवालदिल झाला आहे.
गत वर्षी कापसाला १२ हजार रुपयांच्यावर दर मिळाला होता. यंदाही कापसाला मागणी राहील, दर किमान दहा हजार रुपये मिळेल, या आशेने शेतकर्यांनी बरीच वाट पाहिली. सुरुवातीला आठ ते साडेआठ हजार रुपये दर मिळाला मात्र किमान १० हजार रुपये प्रति क्विंटल दर मिळेल या अपेक्षेने शेतकर्यांना कापूस विकलाच नाही. खरीप हंगामातील ५५ ते ६० टक्के कापूस अद्यापही शेतकर्यांकडे पडून आहे. गेल्या आठवड्यात कापसाला ७ हजार २०० ते ७ हजार ५०० चा दर होता. त्यानंतर कापसाचे दर अचानक ६ हजार ५०० पर्यंत घसरले आहेत.
काहीही झाले तरी कापसाला योग्य भाव आल्यानंतर कापूस विकायचा यावर शेतकरी ठाम होते. शेतकर्यांना कमीत कमी दहा हजार रुपये प्रति क्विंटल दराची अपेक्षा होती. त्यामुळे शेतकर्यांनी तब्बल चार महिने घरातच कापूस साठवून ठेवला होता. प्रतीक्षा करूनही बाजारात कापसाच्या दराला सात हजार रुपये क्विंटल पेक्षा अधिकचा दर मिळत नसल्याने शेतकर्यांनी नाईलाजाने आहे त्या दरातच कापूस विकायला सुरुवात केली आहे. आज ना उद्या भाव वधारेल म्हणून अपेक्षा होती मात्र, या हंगामात कापसाचे दर वधारले तर नाहीच, उलट दर कमालीचे घसरत आहेत.
सुरुवातीला उशिराने आलेला मान्सून, कपाशी लागवडीनंतर पावसाने दिलेला खंड, मॉन्सूनच्या परतीच्या प्रवासात झालेली अतिवृष्टी या नैसर्गिक संकटामुळे कापसाच्या उत्पादनावर मोठा परिणाम झाला. परतीच्या प्रवासात झालेल्या अतिवृष्टीमुळे झाडालाच फुटलेल्या कापसाच्या वाती झाल्या तर, काही ठिकाणी फुटलेला कापूस काळा पडल्याने शेतकर्याचे मोठे नुकसान झाले. प्रती एकर उत्पादनात घट होऊनही दहा ते पंधरा रुपये किलो प्रमाणे मजुरी देऊन शेतकर्यांनी कापसाची वेचणी केली. मात्र हाती काहीच आले नाही, अशी सध्याची परिस्थिती आहे.
दर कमी होण्याची कारणे
आंतरराष्ट्रीय पातळीवर कापसाला मागणी कमी आहे. सोबतच खंडीचे दर ५५ हजारापर्यंत आहेत, जे ७० हजारापर्यंत होते. सरकीचे दरही ३२०० वरून २६००पर्यंत खाली आले. मागणीच नसल्याने जिनर्स गाठी तयार करून कोणाला विकणार? असा प्रश्न आहे. यामुळे कापसाला आज ६८०० दर मिळाल्याने शेतकरी निराशेच्या गर्गेत आहे. सध्या ज्या जिनिंग सुरू आहेत, त्या एका पाळीत सुरू आहेत. एखाद्या जिनमध्ये चारशे गाठी तयार होत असतील, तर त्यांना केवळ दोनशे गाठींचाच कापूस उपलब्ध होत आहे.