जळगाव लाईव्ह न्यूज । १८ नोव्हेंबर २०२५ । जळगाव जिल्ह्यात नगराध्यक्षांसारख्या महत्वाच्या पदांसाठी अनेक नेत्यांची फॅमिली निवडणुकीच्या मैदानात उतरली. नगरपरिषदेच्या निवडणुकीत उमेदवारी अर्ज भरण्याच्या दिवशी नेत्यांनी कुटुंबातील व्यक्तींना राजकारणाला प्राधान्य दिल्याचे दिसून आले. कुणी पत्नीला तर कुणी कुटुंबातील सदस्याला निवडणुकीत उमेदवारी दिली आहे. मात्र यामुळे वर्षानुवर्षे पक्षनिष्ठा जपणाऱ्या कार्यकर्त्यांवर पुन्हा एकदा सतरंज्या उचलण्याची वेळ आली आहे.

जळगाव जिल्ह्यात एकूण १६ नगरपरिषद आणि २ नगरपंचायती अशा १८ ठिकाणी २ डिसेंबर रोजी मतदान होणार आहे. त्यात भुसावळसह अमळनेर, चाळीसगाव, चोपडा, जामनेर, पाचोरा, यावल, नशिराबाद, वरणगाव, पारोळा, भडगाव, धरणगाव, एरंडोल, फैजपूर आणि सावदा या नगरपरिषदांचा समावेश आहे. तसेच शेंदुर्णी आणि मुक्ताईनगर या २ नगरपंचायतींचा समावेश आहे.

नामनिर्देशन अर्ज दाखल करण्याची मुदत सोमवारी संपली असून, नगरसेवकांच्या ४६४ जागांसाठी तब्बल ३५४२ उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. नगराध्यक्षपदाच्या १८ जागांसाठी २२९ उमेदवारांनी अर्ज दाखल करून स्पर्धा चुरशीची होण्याचे संकेत दिले आहेत. भुसावळ नगरपरिषद क्षेत्रातील अखेरच्या दिवशी दाखल झालेल्या अर्जांची अधिकृत माहिती सोमवारी रात्री उशिरापर्यंत उपलब्ध झाली नव्हती. यामुळे भुसावळमधील अंतिम आकडेवारीची उत्सुकता कायम आहे.
दरम्यान जिल्ह्यातील अनेक ठिकाणी नगराध्यक्ष पदांसाठी नेत्यांनी स्वतःच्या पत्नी, कुटुंबातील सदस्यांना उमेदवारी दिली आहे. ज्यामुळे कार्यकर्त्यांवर पुन्हा एकदा सतरंज्या उचलण्याची वेळ आली आहे. दरम्यान, आमदारकी मिळवल्यानंतर आता नगराध्यक्षपदही घरातच येणार की मतदार त्यांना धक्का देणार, हे येत्या ३ डिसेंबर रोजी निवडणूक निकालानंतर स्पष्ट होणार आहे.
जिल्ह्यातील १६ नगर परिषद आणि २ नगर पंचायतींच्या निवडणुकांसाठी सर्वच राजकीय पक्षांनी कंबर कसून प्रचाराची तयारी सुरू केली आहे. जिल्ह्यातील काही ठिकाणी महायुतीमध्ये फूट पडल्याचं दिसून आले. ज्यात मंत्री गिरीश महाजन यांच्या जामनेरमध्ये तसेच आमदार मंगेश चव्हाण यांच्या चाळीसगावमध्ये आणि पाचोऱ्यात भाजप स्वबळावर लढण्यासाठी सज्ज झाली आहे.
कोणी कुठे अर्ज दाखल केले ?
नगराध्यक्षपदासाठी जामनेरमध्ये भाजप नेते मंत्री गिरीश महाजन यांच्या सौभाग्यवती साधना महाजन, भुसावळमध्ये वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे यांच्या सौभाग्यवती रजनी सावकारे, चाळीसगावमध्ये भाजप आमदार मंगेश चव्हाण यांच्या सौभाग्यवती प्रतिभा चव्हाण आणि माजी आमदार दिवंगत राजीव देशमुख यांच्या पत्नी पद्मजा देशमुख, पाचोऱ्यात शिंदे गटाचे आमदार किशोर पाटील यांच्या सौभाग्यवती सुनिता पाटील आणि भाजपचे माजी आमदार दिलीप वाघ यांच्या सौभाग्यवती सुचेता पाटील, मुक्ताईनगरात शिंदे गटाचे आमदार चंद्रकांत पाटील यांच्या कन्या संजना पाटील यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत.











