⁠ 
शुक्रवार, मार्च 29, 2024

पिंप्राळा उड्डाण पुलासाठी भुसंपादनाचा तिढा कायम

जळगाव लाईव्ह न्यूज । १० मे २०२२ । शहरातील पिंप्राळा रेल्वेगेट जवळ होत असलेल्या रेल्वे उड्डाण पुलाच्या आर्मसाठी मनपाला भूसंपादन करावे लागणार आहे. यासाठी मनपा आयुक्त डॉ. विद्या गायकवाड यांच्या दालनात बैठक पार पडली मात्र, या बैठकीत भुसंपादनाचा विषय मार्गी लागला नसून तिढा कायम राहिला आहे.


पिंप्राळा रेल्वे गेट जवळ रेल्वे उड्डाण पुल मंजुर झाला असून या पुलाचे काम जोरात सुरु आहे. सार्वजनिक बांधकाम विभाग व रेल्वे प्रशासनाकडून हे काम केले जात आहे. परंतु या पुलाच्या पिंप्राळाकडे जाणाऱ्या आर्मसाठी मनपाला भुसंपादन करुन द्यावे लागणार आहे. त्यासंदर्भांत रेल्वेने मनपाला पत्र व्यवहात देखील केला आहे. त्यानुसार महापालिकेने बाधित होणाऱ्या मालमत्तेचे मालक श्री. भोईटे यांना बोलावून त्यांच्याशी चर्चा केली असता श्री. भोईटे यांनी त्यांचे प्लॉट नं. ८२, ८३,८४,८५,८६ हे सर्व प्लॉट मनपाने खरेदी करावे, असा प्रस्ताव मनपा पुढे ठेवला आहे.

मात्र, मनपाला फक्त बाधित होणारे प्लॉट नं. ८२,८३,व ८४ ह्याच प्लॉटची आवश्यकता असल्यामुळे इतर प्लॉट खरेदीला मनपा प्रशासनाने नकार दिला आहे. यावर श्री. भोईटे यांनी आपली बाजू मांडतांना सांगितले की, मनपाला जरी तीनच प्लॉटची आवश्यकता आहे. मात्र, उर्वरीत दोन प्लॉटचा विकास करतांना भोईटे यांना उड्डाण पुलाच्या अडचणी निर्माण होणार आहेत. त्यामुळे मनपाने सर्व पाचच्या पाच जागांचे भूसंपादन करावे, अन्यथा एकही जागा देणार नाही, अशी भूमिका श्री. भोईटे यांनी घेतली आहे.

त्यामुळे भुसंपादनाचा तिढा सध्यातरी कायम आहे. याबैठकीत आमदार राजूमामा भोळे, भाजप महानगर अध्यक्ष दिपक सुर्यवंशी, पिंप्राळ्याचे नगरसेवक सुरेश सोनवणे, मयुर कापसे, विशाल त्रिपाठी, अतुल बारी यांच्यासह मनपाच्या बांधकाम विभागाचे अधिकारी व नगररचना विभागाचे अधिकारी उपस्थित होते.