लाडक्या बहिणींची प्रतीक्षा संपली! आजपासून बँक खात्यात जमा होणार ऑगस्टचे १५०० रुपये

जळगाव लाईव्ह न्यूज । मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांसाठी आनंदाची बातमी असून ऑगस्ट महिन्याच्या हप्त्याची प्रतीक्षा आता संपली आहे. पात्र महिलांच्या बँक खात्यात ऑगस्ट हप्त्याची रक्कम जमा होण्यास सुरुवात झाली आहे. दोन दिवसांत लाडकींच्या खात्यामध्ये १५०० रुपये जमा होतील असे सांगण्यात आले होते. त्यानुसार आजपासून लाडकींच्या खात्यात पैसे जमा होणार आहे.
राज्य शासनाकडून लाडक्या बहिणींना ऑगस्ट महिन्याचा हप्ता देण्यासाठी निधी हस्तांतरित करण्यात आला होता. त्यानुसार, सामाजिक न्याय विभागाने ऑगस्टच्या हप्त्यासाठी ३३९ कोटी रुपयांचा निधी वर्ग केला आहे. याविषयी माहिती देताना सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट यांनी सांगितले होते की, शासनाने यासंदर्भातील शासन निर्णयही (GR) जारी केला होता, ज्यामुळे महिलांच्या खात्यात पैसे जमा होण्याचा मार्ग मोकळा झाला होता. आता प्रत्यक्ष डीबीटीद्वारे महिलांच्या खात्यात पैसे जमा होण्यास सुरुवात झाली आहे.
दरम्यान, ऑगस्ट आणि सप्टेंबर या दोन्ही महिन्यांचे पैसे एकत्र मिळून ३,००० रुपये मिळतील, अशी चर्चा होती. मात्र उपलब्ध शासन निर्णयात प्रत्येक लाभार्थीला ३,००० रुपये मिळतील, अशी स्पष्ट पुष्टी नसल्याचे वृत्त आहे. त्यामुळे सध्या ऑगस्टच्या १,५०० रुपयांच्या हप्त्याबाबतच अधिकृत माहिती उपलब्ध आहे.




