जळगाव लाईव्ह न्यूज । 16 जानेवारी 2024 । जर तुम्ही सुरक्षित गुंतवणूकीची योजना आखत असाल आणि तुमचे पैसे दुप्पट करायचे असतील तर तुम्ही सध्याच्या घडीला पोस्ट ऑफिसच्या ‘किसान विकास पत्र’ योजनेत गुंतवणूक करू शकता. पैसे वाचवणे जितके महत्त्वाचे आहे, तितकेच त्या पैशांची योग्य ठिकाणी, योग्य योजनांमध्ये गुंतवणूक करणे आवश्यक आहे.
पोस्ट ऑफिसच्या ‘किसान विकास पत्र’ योजना ही एक सरकारी योजना आहे आणि त्यात गुंतवणूक करून आपण हमीभावाने आपले पैसे दुप्पट करू शकता. इतर कुठल्या खाजगी कंपन्यांच्या आमिषांना बळी पडून पैसे बुडवण्यापेक्षा पोस्ट ऑफिसच्या या योजनेचा विचार करणे केव्हाही चांगले ठरू शकेल.
किसान विकास पत्र या योजनेच्या अटींविषयी बोलायचे झाल्यास, तुम्ही या योजनेत किमान एक हजार रुपये गुंतवून योजनेचा लाभ घेण्यास सुरुवात करू शकता. ग्राहकांना जास्तीत जास्त पैसे गुंतवायचे असतील, तर त्याला काहीही मर्यादा नाही. या योजनेंन्तर्गत तुम्ही 1000, 5000 रुपये, 10,000 आणि 50,000 रुपयांपर्यंतची प्रमाणपत्रे खरेदी करून पैशांची गुंतवणूक करू शकाल.
ही दीर्घ मुदतीची गुंतवणूक योजना आहे. म्हणजेच तुम्हाला एकदा पैसे भरावे लागतील आणि त्यानंतर तुम्हाला सुमारे 10 वर्षांनंतर दुप्पट परतावा मिळेल. या योजनेंतर्गत दर तिमाहीवर व्याज दर निश्चित केला जातो. सध्या या योजनेला 7.5 टक्के दराने व्याज मिळत आहे. जर तुम्ही त्यात आजच्या घडीला अडीच लाख रुपये जमा केले तर दहा वर्षानंतर तुम्हाला दुप्पट रिटर्न मिळतील.