जळगाव लाईव्ह न्यूज | २९ मार्च २०२३ | गेल्या काही आठवड्यांमध्ये जळगाव जिल्हा दूध संघ व जिल्हा बँकेतील सत्ता राष्ट्रवादीने (NCP) गमावली आहे. जळगाव जिल्हा राष्ट्रवादीने कितीही नाही म्हटले तरी खडसे गट व जुना राष्ट्रवादी गट असे दोन गट स्पष्टपणे दिसून येतात. याची कल्पना पक्षश्रेष्ठींना देखील आहे. जुना राष्ट्रवादी गटातही माजी मंत्री गुलाबराव देवकर (Gulabrao Deokar) , डॉ. सतीष पाटील यांना मानणारा गट वेगवेगळा आहे. पक्षातील गटातटाच्या राजकारणामुळेच जळगाव जिल्हा काँग्रेसची केविलवाणी अवस्था झाली आहे. एका पाठोपाठ दोन पराभवांमागे गटा-तटाचे राजकारण आहे, हे नाकारुन चालणार नाही. ‘राष्ट्रवादी काँग्रेसच्या जिल्ह्यातील नेत्यांमध्ये एकजूट नाही. वेगवेगळ्या दिशांना त्यांची तोंडे आहेत’, अशा शब्दात पक्षाच्या कार्यकर्त्यांनी त्यांच्या मनातील खदखद प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांच्यासमोर व्यक्त केली. मात्र प्रदेशाध्यक्षांनी ठोस भुमिका मांडलीच नाही.
राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी नुकताच जळगाव जिल्हा दौरा केला. या दौर्यात त्यांनी जळगाव, पाचोरा, पारोळा, जामनेर, भुसावळ येथे आढावा बैठका घेतल्या. या बैठकांमध्ये राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी तळमळीने स्पष्ट व रोखठोक भुमिका मांडल्या. कारण पक्षाने एकामागून एक असे दोन सत्ताकेंद्रे गमाविली. या दोन्ही पराभवांमागे एकमेव कारण म्हणजे, गटातटाचे राजकारण! नेमकी हिच बाब कार्यकर्त्यांनी प्रदेशाध्यक्षांच्या निदर्शनास आणून दिली. दूध संघात जिल्ह्यातील नेत्यांनी हातमिळवणी केली. संजय पवार, दिलीप वाघ यांनी स्वत:साठी तडजोड केल्याने पक्षाचा पराभव झाला. जिल्हा बँक निवडणुकीत संजय पवार यांनी पक्षाच्या विरोधात काम केले. मात्र अद्यापावोतो कुणावरही कारवाई झाली नाही.
दूध संघानंतर जिल्हा बँक निवडणुकीत पक्षाच्या हिताविरोधात काम करणार्या व्यक्ती मुंबईत येऊन नेत्यांकडून वाहव्वा मिळवतात. यामुळे कार्यकर्त्यांची मानसिक खच्चीकरण होत आहे. कोणी कसेही वागले तरी चालून येईल, असा चुकीचे संदेश जाऊ शकतो. त्यामुळे पक्षशिस्त मोडणार्या व्यक्तींना पक्षात ठेवू नका, त्यांच्यावर कारवाई करा, अशी मागणी कार्यकर्त्यांनी केली. मात्र यावर प्रतिक्रिया देतांना, सहकार क्षेत्रातील दूध संघ, जिल्हा बँक यांच्या पक्षीय निवडणुका नसतात. परंतु यामध्ये पक्षाची अप्रतिष्ठा झाली, जिल्हाध्यक्षांच्या विरोधात कारवाया झाल्या आहेत याची नोंद घेतली जाईल, अशी मोघम भुमिका जयंत पाटील यांनी मांडली. मात्र त्याचवेळी पदे मिरवण्यापेक्षा पदाला न्याय द्या, अशा शब्दात जयंत पाटील यांनी पदाधिकार्यांचे कान टोचले.
प्रदेशाध्यक्ष या नात्याने जर जयंत पाटील यांनी कठोर भुमिका घेतली असती तर राष्ट्रवादीचे ‘दादा’ अजित पवार किंवा ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे हे दुखावण्याची शक्यता होती. यामुळे जयंत पाटील यांनी केवळ मोघम शब्दांचा वापर केल्याचे स्पष्टपणे दिसून आले. जिल्हा बँकेत भाजपाला राष्ट्रवादीशिवाय पर्याय नाही. हा भाजपाचा पराभव आहे. आमदार एकनाथ खडसेंना पक्षात घेतल्याने जिल्ह्यात पक्ष बळकट झाल्याचा दावा केला मात्र दोन परावभवांची जबाबदार कुणाची? यावर बोलणे टाळले.