जळगाव लाईव्ह न्यूज । २९ मार्च २०२५ । जामनेरमध्ये ट्रॅक्टरचा भीषण अपघात घडला आहे. चालकाचं वाहनावरील नियंत्रण सुटल्याने ट्रॅक्टरनं दहा ते बारा दुचाकींना उडवल्याची धक्कादायक घटना घडली आहे. सुदैवानं या अपघातामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही, मात्र दुचाकींचं मोठं नुकसान झालं आहे. दरम्यान घटनेची माहिती मिळताच जामनेर पोलीस घटनास्थळी दाखल झाले.

जामनेर शहरातील वाकी रोड परिसरात हा अपघात घडला आहे. या ठिकाणावरून जात असताना अचानक चालकाचं ट्रॅक्टरवरील नियंत्रण सुटलं, त्यानंतर अनियंत्रित झालेल्या ट्रॅक्टरनं या परिसरात पोस्ट ऑफिस तसेच बँकेबाहेर उभ्या असलेल्या दुचाकींना उडवलं, या घटनेत दहा ते बारा दुचाकींचं नुकसान झालं आहे.
दरम्यान अपघात घडल्यानंतर चालक ट्रॅक्टर जोगेवरच सोडून पसार झाला. चालक दारूच्या नशेत असावा असा अंदाज स्थानिकांनी व्यक्त केला आहे. या अपघातामध्ये दुचाकींचं मोठं नुकसान झालं आहे. दुचाकी मालकांनी नुकसान भरपाईची मागणी केली आहे. घटनेची माहिती मिळताच जामनेर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन नुकसानाची पाहाणी केली. ज्या वाहनांचं नुकसान झालं आहे, त्यांच्या मालकांची नावं लिहून घेण्यात आली आहेत. अपघातानंतर चालक घटनास्थळावरून फरार झाला आहे, त्याचा शोध सुरू असून, घटनेबाबत अधिक तपास सुरू असल्याची माहिती या अपघात प्रकरणात पोलिसांनी दिली आहे.