जळगाव लाईव्ह न्यूज । १३ मे २०२४ । महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यात सध्या मान्सूनपूर्व पाऊस होत असून यामुळे उन्हाच्या चटक्यापासून दिलासा मिळत आहे. मात्र दुसरीकडे यामुळे शेतकऱ्यांना मोठे नुकसान सोसावे लागत आहे. अनेक ठिकाणी वादळी वाऱ्यासह पावसाने हजेरी लावल्याने फळबागांचे मोठे नुकसान झाले. यातच हवामान खात्याने आजही राज्यामध्ये वादळी वाऱ्यासह पावसाचा इशारा दिला आहे. तर उत्तर कोकणात उष्ण लाटेचा इशारा हवामान विभागाने दिलेला आहे. दरम्यान, सोमवारी राज्यातील सर्वाधिक तापमान जळगावात नोंदविले गेलं.
राज्यात २६ जिल्ह्यांमध्ये आज मंगळवारी (ता. १४) वादळी वाऱ्यासह वळिवाच्या पावसाच्या सरी बरसतील, असा ‘येलो अलर्ट’ हवामान विभागाने सोमवारी वर्तविला. दुसरीकडे राज्यात सर्वाधिक तापमान जळगावमध्ये ४१.६ अंश सेल्सिअस नोंदले गेले.
जळगावात गेल्या तीन चार दिवसापासून अवकाळी पावसाचे सावट आहे. रविवारी पहाटे २ वाजेच्या सुमारास जिल्ह्यातील अनेक भागात अवकाळी पावसाने हजेरी लावली. ढगाळ वातावरणामुळे जिल्ह्यातील तापमानात किंचित घट झालेली असली तरी सोमवारी राज्यातील सर्वाधिक तापमानाची नोंद झाली.
आज या जिल्ह्यांना अलर्ट
रायगड, रत्नागिरी, नाशिक, नगर, पुणे, सिंधुदुर्ग, सातारा, सांगली, कोल्हापूर, छत्रपती संभाजीनगर, सोलापूर, जालना, बीड, धाराशिव, बुलडाणा, अकोला, लातूर, अमरावती, वाशीम, वर्धा, नागपूर, यवतमाळ,भंडारा, चंद्रपूर, गोंदिया, गडचिरोली या जिल्ह्यांना वादळी पावसासाठी येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. ठाणे, पालघर, मुंबईसाठी उष्ण लाटेचा पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
दक्षिण कर्नाटकमध्ये सध्या चक्राकार वाऱ्यांची स्थिती आहे. वायव्य मध्य प्रदेश, मध्य महाराष्ट्र आणि दक्षिण कर्नाटकपर्यंत चक्राकार वाऱ्यांमुळे हवेचा कमी दाबाचा पट्टा सक्रिय झाला आहे. आज राज्यामध्ये वादळी वाऱ्यासह पूर्वमोसमी पावसाचा इशारा कायम सांगण्यात आला आहे. तर उत्तर कोकणातील ठाणे, पालघर, मुंबईमध्ये उष्ण लाट, उष्ण आणि दमट हवामानाचा इशारा हवामान विभागाकडून देण्यात आला आहे.