जळगाव मनपा कचरा संकलनासाठी वॉटरग्रेसला दर महिन्याला देते दिड कोटी

जळगाव लाईव्ह न्यूज । चिन्मय जगताप । जळगाव शहराच्या स्वच्छतेची स्थिती किती निंदनीय आहे? हे काही आता नागरिकांना वेगळे सांगायची गरज नाही. जिथे आपली नजर पडेल तिथे कचऱ्याचा ढीग आपल्याला पाहायला मिळतो. विशेष म्हणजे वॉटर ग्रेस कंपनीला यासाठी मक्ता मनपातर्फे देण्यात आला आहे. आणि या कंपनीला मनपाने आठ महिन्यात तब्बल १३ कोटी रुपये दिले आहेत. यामुळे शहरात इतकी अस्वच्छता असतांना देखील नेमक्या कोणत्या आधारावर इतके बिल मनपाने दिले हा महत्वाचा प्रश्न आहे.

तर दुसरीकडे जळगाव शहराचा विस्तार दिवसेंदिवस झपाट्याने होत असून नवनवीन वस्ती आणि नगर देखील वाढत आहे. जळगाव शहरातील कचरा संकलन आणि स्वच्छतेच्या कामासाठी मनपाचे कर्मचारी अपूर्ण पडत असल्याने दरवर्षी बाहेरील यंत्रणेच्या माध्यमातून स्वच्छता आणि कचरा संकलन करण्यात येत होते. काही वर्षापूर्वी प्रभागनिहाय पद्धत तोडून शहरातील कचरा संकलनासाठी एकमुस्त पद्धतीने मक्ता देण्याचे निश्चित करण्यात आले होते. जळगावात निविदा प्रक्रिया राबविल्यावर वॉटरग्रेस कंपनीचे नाव निश्चित झाले होते. मात्र प्रत्यक्षात काम काही दिसत नाहीये. हे कटू सत्य आहे.

दिवाळीमुळे वाढला शहरातला कचरा

दिवाळीच्या अलीकडे शहराचे आमदार राजूमामा भोळे यांनी मनापामध्ये आढावा बैठकीचे आयोजन केले होते. जळगाव शहरातला कचरा हा दिवाळी सण आला म्हणून वाढला आहे. पर्यायी इतरत्र आपल्याला कचरा पाहायला मिळत आहे. असे अजब उत्तर वॉटरग्रेसच्या प्रतिनिधीने आमदार राजुमामा भोळे यांना दिले होते. मात्र असे उत्तर देऊनही अजूनही कोणतीही कारवाई करण्यात आली नव्हती.

मनपाने दरमहा अदा केलेल्या बीलाची रक्कम (सन २०२२)
जानेवारी १ कोटी ६८ लाख २७ हजार ९९९ रुपये
फेब्रुवारी १ कोटी ५२ लाख २५ हजार ६९९रुपये
मार्च १ कोटी ६६ लाख ४० हजार ६७० रुपये
एप्रिल १ कोटी ६० लाख ५६ हजार २०० रुपये
मे १ कोटी ५६ लाख ७१ हजार ४६२ रुपये
जून १ कोटी ५१ लाख १४ हजार ९७१ रुपये
जुलै १ कोटी ६६ लाख ९८ हजार ३९८ रुपये
ऑगस्ट १ कोटी ६५ लाख ६३ हजार ४७३ रुपये
एकूण १२ कोटी ८७ लाख ९८ हजार ८७० रुपये

८ महिन्यात फक्त ५८ लाखाचा दंड
तर दुसरीकडे मनपाने वॉटरग्रेस कंपनीला गेल्या ८ महिन्यात (जानेवारी २०२२ ते ऑगस्ट २०२२) केवळ ५७ लाख ७० हजार ८०० रुपये इतका दंड ठोठावला आहे.

वॉटरग्रेसला देण्यात आलेली बिल नियमानुसार देण्यात आली आहेत.
डॉ.विद्या गायकवाड, आयुक्त मनपा जळगाव.


वॉटरग्रेसकंपनी करारा नुसार काम करत नाही. सर्व ७५ नगरसेवक त्यांना विरोध करत आहेत. मात्र तरीही मनपा त्यांच्यावर कारवाई करत नाही. हे चुकीचे आहे. नक्की वॉटरग्रेसच्या मागे कोण ठामपणे उभे आहे. हे समजत नाहीये.
प्रा.सचिन पाटील, नगरसेवक, मनपा जळगाव.