⁠ 
बुधवार, एप्रिल 24, 2024

मनपा विशेष : जळगाव मनपाचे महापौर आरक्षण पुढील वर्षी बदलणार, एससी प्रवर्गाला मिळणार संधी !

जळगाव लाईव्ह न्यूज । मनपा विशेष। जळगाव शहर महानगरपालिका निवडणूकीसाठी अद्याप एक वर्ष बाकी असले तरी निवडणुकीचे वारे वाहू लागले आहेत. इच्छुकांकडून योग्य प्रभाग शोधत तयारी सुरू करण्यात आली आहे. दरम्यान, जळगाव मनपाच्या महापौर पदाचे आरक्षण पुढील वर्षी अनुसूचित जाती (एससी) या प्रवर्गासाठी सुटण्याची शक्यता आहे.

जळगाव शहर महानगरपालिकेची स्थापना २१ मार्च २००३ रोजी झाली होती. जळगाव मनपाची पहिलीच निवडणूक पार पडल्यानंतर महापौरपदासाठी खेळण्यात आलेल्या खेळीत आशाताई कोल्हे यांची वर्णी लागली होती. जळगाव मनपाच्या महापौरपदाचे आजवरचे आरक्षण लक्षात घेतले असता २००३ मध्ये महिला जनरल व एसटी जनरल, २००८ मध्ये पुरुष जनरल व ओबीसी जनरल, २०१३ मध्ये महिला जनरल व पुरुष जनरल, २०१८ मध्ये महिला जनरल व पुन्हा महिला जनरल असे निघाले होते.

आजवर जळगाव मनपाच्या महापौर पदाचा मान आशाताई कोल्हे, तनुजा तडवी, रमेश जैन, प्रदीप रायसोनी, अशोक सपकाळे, सदाशिवराव ढेकळे, विष्णू भंगाळे, जयश्री धांडे, किशोर पाटील, राखी सोनवणे, नितीन लढ्ढा, ललित कोल्हे, सीमा भोळे, भारती सोनवणे यांना मिळाला असून सध्या जयश्री महाजन या विद्यमान महापौर आहेत.

जळगाव महापालिकेत महापौर पदासाठी आजपर्यंत निघालेल्या आरक्षणमध्ये अनुसूचित जाती या प्रवर्गाला संधीच मिळालेली नाही त्यामुळे पुढील वर्षी होणाऱ्या निवडणुकीत महापौर पद अनुसूचित जाती (एससी) या प्रवर्गासाठी राखीव असण्याची शक्यता आहे. निवडणूक आयोग आणि राज्य शासनाकडून जळगाव मनपाची निवडणूक प्रक्रिया हाती घेण्यात आल्यानंतर सर्व चित्र स्पष्ट होणार आहे.