मनपात उद्या महापौर नेतृत्वात आढावा बैठक
जळगाव लाईव्ह न्यूज । १५ सप्टेंबर २०२२ । महापौर, आयुक्त, २ माजी महापौर व डायमंड गृपने दुपारी शहरातील महामार्गावरील खड्डे व गैरसोयीचा विषय अजेंड्यावर आल्यानंतर सायंकाळी खासदार उन्मेश पाटील यांनी एनएचआयचे अधिकारी चंद्रकांत सिन्हा, प्रकल्प गुणवत्ता सल्लागार प्रदीप द्विवेदी यांचा भर रस्त्यावर वर्ग घेतला.खासदार म्हणाले, ‘सिन्हा महामार्गाचे प्रकल्प प्रमुख तुम्ही आहात. कामाची गुणवत्ता व लोकांची सोय तुम्ही पाहा. जर काम जमत नसेल तर मी तुमच्या तोंडाला डांबर फासतो. आठ दिवासात तक्रारी दूर करा. नाहीतर येथून तुमचे पार्सल दुसरीकडे घेऊन जा !’खासदार गुणवत्ता सल्लागारला म्हणाले, ‘तुम्ही बिहारचे आहात. काही तरी थातूर मातूर काम करून पळून जायचा प्रयत्न करू नका !’
खासदार पाटील यांनी भरवलेल्या या शाळेत अनेकवेळा रूद्रावतार घेतला. यावेळी महापौर जयश्री महाजन, डायमंड गृपच्या ॲडमीन सरीता माळी कोल्हे, दिलीप तिवारी, राजेश नाईक, सुनील महाजन, चंद्रकांत जैन, नगरसेविका उज्ज्वला बेंडाळे, गायत्री राणे, भादलीचे सरपंच मिलींद चौधरी आदी सहभागी झाले. एनएचआयचे अधिकारी इतर लोकप्रतिनीधींना फारसे ‘मोजत’ नाहीत. पण खासदारांनी महामार्ग पाहणी दौरा लागल्यानंतर सिन्हा, द्विवेदी धावतपळत आले. सकाळी महापौर व माजी महापौरांनी बोलावले तेव्हा सिन्हा आले नव्हते.
जनरल अरूणकुमार वैद्य चौकातून महामार्ग पाहणी सुरू झाली. शिवकॉलनीजवळचा महाकाय खड्डा पाहून खासदार भडकले. डिव्हायडर मधून पाणी शिरून रस्ता खराब झाला असा जावाई शोध सल्लागाराने लावला. तेथे तिवारी यांनी महामार्गचा डीपीआर आहे कुठे ? हा प्रश्न करून अनेक तांत्रिक मुद्दे मांडले. तेव्हा सिन्हा यांनी सल्लागार म्हणून द्विवेदीःना पुढे केले.
तेथून दादावाडीजवळचा अंडरपास येथे तुंबणारे पाणी, तुटलेले पन्हाळ, पावसाचे इतर ठिकाणी जाणारे सांडपाणी हा प्रकार समोर आला. या ठिकाणी आजूबाजूचे नागरिक गोळा झाले. त्या सर्वांनी अधिकारीवर्गावर आवाज वाढवला. याच ठिकाणी खासदारांनी सिन्हा व द्विवेदी यांना वाईट भाषेत इशारा दिला. महामार्गावर अतिक्रमणात उभारलेल्या इच्छादेवी पोलीस चौकीचा मुद्दा याच ठिकाणी चर्चेला आला. तेव्हा मनपाच्या जागेत परस्पर एनएचआयने परवानगी दिल्याचे आढळले. येथे महापौर महाजन व सरीता माळी कोल्हे यांनीही सुनावले.
तेथून नंतर प्रभात चौकातील अंडरपासजवळचे प्रश्न पाहायला खासदार गेले. तेथे नगरसेविका बेंडाळे व राणे यांनी अडचणी मांडल्या. खासादार पाटील यांनी सिन्हा व द्विवेदी यांनी सूचना केली. उद्या, शुक्रवारी दुपारी ४ वा. मनपात महामार्ग लगतचे नगरसेवक, मनपा अभियंता व एनएचआयचे अधिकारी यांची बैठक घ्या. महामार्गावरील सर्व अडचणी निश्चित करून ते आठ दिवसात सोडवायचा प्रयत्न करा. यावर सार्वांची सहमती झाली.
अशाप्रकारे महिला नेत्या व अधिकारी यांनी दुपारी सुरू केलेला विषय एनएचआयच्या दारावर पोहचला. उद्या मनपातील बैठकीत निर्णय झाल्यानंतर डायमंड गृप सोमवारी आंदोलनाबाबत निर्णय घेणार आहे.