⁠ 
गुरूवार, एप्रिल 18, 2024

राज्यात सत्ता येण्यापूर्वीच जळगावचे आमदार मनपात सक्रिय!

जळगाव लाईव्ह न्यूज । २७ जून २०२२ । राज्यात मोठा गदारोळ उडाला असून महाविकास आघाडीची सत्ता जाणार कि टिकणार आणि नवीन सरकार स्थापन होणार का? असे तर्कवितर्क सध्या बांधले जात आहे. भाजपसोबत मिळून एकनाथ शिंदे गट सरकार स्थापनेचा दावा करीत आहे. सरकार अल्पमतात आल्याचे म्हटले जात असून भाजप सरकार स्थापन करण्याची शक्यता आहे. राज्यात सरकार येवो नको येवो पण जळगाव शहरातील भाजप आ.सुरेश भोळे हे मात्र लागलीच मनपात सक्रिय झाले आहे. जळगावातील विकासकामांचा आढावा घेण्यासाठी आ.भोळे यांनी आज दि.२७ रोजी दुपारी मनपात आढावा बैठक बोलावली आहे.

जळगाव शहरातील राजकारण गेल्यावर्षी ढवळून निघाले होते. सध्या राज्यातील राजकारण ढवळून निघाले असून शिवसेनेचे जेष्ठ मंत्री एकनाथ शिंदे हे बंडखोरी करीत बाहेर पडले आहेत. शिंदे यांच्यासोबत सध्या शिवसेनेचे ३९ आमदार असून इतर अपक्ष आमदार आहेत. शिवसेनेच्या दोन तृतीयांश आमदारांच्या बळावर एकनाथ शिंदे गट भाजपच्या सहकार्याने सत्ता स्थापनेचा दावा करण्याच्या विचारात आहेत. १६ आमदारांना अपात्र करण्याच्या याचिकेवर आज सर्वोच्च न्यायालयात कामकाज होत असून त्याठिकाणी शिंदे गटाची मजबूत मानली जात आहे.

राज्यात भाजप अचानक सक्रिय झाल्यानंतर जळगाव शहराचे आ.सुरेश भोळे देखील सक्रिय झाले आहेत. शिवसेनेचे खा.संजय राऊत यांच्या वक्तव्याला सडेतोड उत्तर देणारे ट्विट आ.भोळे यांनी सकाळीच केले आहे. ट्विटमधून आ.भोळे यांनी थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याच नेतृत्वावर अविश्वास दाखविला आहे. दरम्यान, जळगाव शहरातील विविध विकास कामांचा आढावा घेण्यासाठी आ.सुरेश भोळे यांनी महापालिकेत बैठक बोलावली आहे. आ.भोळे यांनी बैठक बोलावल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या असून नागरिकांच्या समस्या मांडण्यासाठी ही बैठक असल्याचे बोलले जात आहे.

आ.सुरेश भोळे यांनी बोलावलेल्या बैठकीवर सत्ताधारी आणि विरोधकांच्या काय प्रतिक्रिया उमटतात हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.