अमळनेरच्या प्रसिद्ध संत सखाराम महाराज वाडी संस्थानात भीषण आग

जुलै 2, 2026 9:30 AM

जळगाव लाईव्ह न्यूज । महाराष्ट्रातील प्रसिद्ध ‘प्रति पंढरपूर’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अमळनेर येथील संत सखाराम महाराज वाडी संस्थानात बुधवारी रात्री शॉर्टसर्किटमुळे भीषण आग लागल्याची धक्कादायक घटना घडली. या दुर्घटनेत विठ्ठल-रुक्मिणी मंदिराच्या वरच्या मजल्यावरील हभप प्रसाद महाराज यांची बैठक खोली आणि लाकडी बांधकामाचे प्रचंड नुकसान झाले आहे. सुदैवाने, मंदिरातील मुख्य देवमूर्ती पूर्णपणे सुरक्षित राहिल्याने भाविकांनी सुटकेचा श्वास सोडला आहे. अग्निशमन दलाच्या १२ ते १४ बंबांनी दोन तासांच्या अथक परिश्रमानंतर ही आग आटोक्यात आली. दरम्यान, इमारतीचे स्ट्रक्चरल ऑडिट होईपर्यंत मंदिर काही दिवस भाविकांसाठी बंद ठेवण्यात येणार आहे.

aml

या आगीच्या आधी बुधवारी दुपारी हभप प्रसाद महाराज संत सखाराम महाराजांची दिंडी घेऊन पंढरपूरकडे रवाना झाले होते. दरम्यान, रात्री साडेआठच्या सुमारास मंदिर परिसरातील सीसीटीव्ही यंत्रणेजवळ अचानक शॉर्टसर्किट झाले आणि त्यातून आगीचा भडका उडाला. संपूर्ण मंदिरात मोठ्या प्रमाणावर लाकडी बांधकाम असल्याने तसेच दरवर्षी ऑइल पेंट करण्यात येत असल्याने काही क्षणांतच आगीने विक्राळ रूप धारण केले.

घटनेची माहिती मिळताच अमळनेर आणि पारोळा नगरपालिकेचे अग्निशमन दल तातडीने घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर परिसरातील नागरिक, स्वयंसेवक, विविध सामाजिक संस्था तसेच खाजगी टँकरधारकांनीही आग विझविण्यासाठी मोठी मदत केली. अग्निशमन दलाच्या १२ ते १४ बंबांनी दोन तासांच्या अथक परिश्रमानंतर ही आग आटोक्यात आली. विशेष म्हणजे, आग विझविण्याच्या मोहिमेत हिंदू आणि मुस्लिम समाजातील नागरिकांनी एकत्र येऊन खांद्याला खांदा लावून सहभाग नोंदवला. सामाजिक सलोखा आणि ऐक्याचे दर्शन घडविणाऱ्या या घटनेचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.

दरम्यान, घटनास्थळी प्रांताधिकारी मयूर भंगाळे, तहसीलदार रुपेशकुमार सुराणा, पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी विनायक कोते यांनी भेट देत परिस्थितीचा आढावा घेतला. दरम्यान, आगीत मंदिराच्या इमारतीचे मोठे नुकसान झाल्याने स्ट्रक्चरल ऑडिट पूर्ण होईपर्यंत संत सखाराम महाराज वाडी संस्थान भाविकांच्या दर्शनासाठी काही दिवस बंद ठेवण्यात येणार असल्याची माहिती प्रांताधिकारी मयूर भंगाळे यांनी दिली.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now