जळगाव लाईव्ह न्यूज । ३० एप्रिल २०२४ । दूध उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देणारी एक बातमी असून जळगाव जिल्हा दूध संघाने गाय व म्हशीच्या दुधाच्या दरात प्रत्येकी २ रुपयांची वाढ केली आहे. जिल्हा दूध संघाचे चेअरमन मंगेश चव्हाण यांनी ही माहिती दिली.
मंगेश चव्हाण यांनी सांगितले की, जागतिक बाजारपेठेत लोणी, दुधाच्या भुकटीचे दर वाढविण्यात आल्यामुळे राज्यभरातील दूध संघांनी दुधाच्या दरात घट केली होती. त्यात जिल्हा दूध संघाने गायीच्या दुधाचा दर २७ रुपयांवर केला होता. तर म्हशीच्या दुधाचा दर ४४ रुपये इतका करण्यात आला होता.
मात्र, जिल्हा दूध संघाकडून लोणी व दूध भुकटीच्या काढण्यात आलेल्या निविदेत चांगला भाव मिळाल्यामुळे जिल्हा दूध संघाने गाय व म्हशीच्या दुधाच्या दरात वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. गायीच्या दुधाचा दर २९ रुपये ४० पैसे तर म्हशीच्या दुधाचा दर ४६ रुपये ६० पैसे एवढा करण्यात आल्याची माहिती चव्हाण यांनी दिली. राज्यातील इतर दूध संघांच्या तुलनेत चांगला दर जिल्हा दूध संघाकडून दिला जात असल्याचे मंगेश चव्हाण यांनी सांगितले.