जळगाव लाईव्ह न्यूज । ३ ऑगस्ट २०२५ । सोने आणि चांदी दरात चढ उतार सुरूच आहे. मागच्या तीन चार दिवपासून सोन्यासह चांदी दरात घसरण दिसून आली. मात्र सोन्याच्या दरात सुरू असलेल्या घसरणीला आता ब्रेक लागला आहे. कारण मागच्या २४ तासात सोन्याच्या दरात मोठी वाढ झाली आहे. सोबतच चांदीही वधारली आहे. एकीकडे रक्षाबंधनाचा सण अगदी जवळ आला असताना दोन्ही धातूंचे दर वाढल्याने ग्राहकांची चिंता वाढली.

जळगाव सराफ बाजारात शनिवारी १० ग्रॅम २४ कॅरेट सोन्याच्या दरात १३०० रुपयांची वाढ झाली आहे. यामुळे हा दर ९९,८०० (जीएसटीसह १०२७९४) रुपयांवर पोहोचला आहे. त्याच वेळी, २२ कॅरेट सोन्याचा दर ११९२ रुपयांनी वाढून विनाजीएसटी ९१४८७ रुपये प्रति १० ग्रॅम झाला आहे. तर दुसरीकडे चांदीचा दरही महागला आहे. चांदी दरात १००० रुपयांची वाढ झाली. यामुळे चांदीचा एक किलोचा दर आता विनाजीएसटी ११२००० रुपयांवर पोहोचला आहे.

दरम्यान, आगामी सणासुदीच्या काळात सोने आणि चांदी दरात वाढ होण्याचा अंदाज जानकरांनी वर्तविला आहे. सध्या देशांतर्गत आणि जागतिक अनिश्चितता, डॉलरमधील चढउतार आणि गुंतवणूकदारांच्या वाढत्या ट्रेंडमुळे सोनेचांदीत वाढ दिसून आली आहे. तज्ज्ञांच्या मते, गुंतवणुकीच्या बाबतीत सोने अजूनही एक विश्वासार्ह आणि सुरक्षित पर्याय मानला जातो.









