जळगाव लाईव्ह न्यूज । २६ सप्टेंबर २०२५ । काही दिवसांपासून सोने-चांदी नवनवीन उच्चांक गाठत आहे. यातच जळगावच्या सुवर्णबाजारात गेल्या २४ तासात चांदीने तब्बल ३००० रुपयाची झेप घेतली आहे. दुसरीकडे १० ग्रॅम सोने ४०० रुपयांनी महागले. एकीकडे दसरा आणि दिवाळी सारखे मोठे सण तोंडावर आले असताना सोने आणि चांदीचे दर धडाधड वाढत असल्याने ग्राहकांना धडकी बसली आहे.

जळगावमध्ये आता सोने-चांदीचा भाव काय?
goodreturns.in नुसार जळगाव सराफ बाजारात १० ग्रॅम २४ कॅरेट सोने दरात ४०० रुपयांची वाढ झाली. हे सोनं खरेदी करण्यासाठी आता तुम्हाला एक लाख १४ हजार ८०० रुपये मोजावे लागणार आहे. तर जीएसटीसह १,१८,२४४ मोजावे लागणार. त्याचसोबत २२ कॅरेटच्या १ तोळा सोन्याच्या दर जीएसटीविना १,०५,३०० रुपये इतका आहे.दुसरीकडे चांदी ३ हजारांनी वाढून चांदी १,४३,१७० प्रतिकिलोच्या विक्रमी दरावर पोहोचली. चांदीने रविवारपासून चौथ्यांदा सर्वकालीन उच्चांकी टप्पा गाठला आहे.

दरवाढीचे कारण काय?
जागतिक बाजारातील अस्थिरता, अमेरिकन फेडरल रिझर्व्ह बँकेची व्याजदर कपात आणि अजून या वर्षाअखेरीस व्याजदर कपातीचे संकेत यामुळे गुंतवणूकदार सोने-चांदीकडे वळाले आहेत. मागणी आणि पुरवठ्यातील व्यस्त प्रमाणामुळे किंमती भडकल्या आहेत. व्याज दर कमी झाल्याचे परिणाम थेट डॉलर आणि बाँडवर दिसत आहे गुंतवणूकदार सुरक्षित गुंतवणूक म्हणून या दोन्ही धातुकडे वळल्याने सोने आणि चांदीचे दर सातत्याने वाढत आहेत.









