जळगाव लाईव्ह न्यूज । २४ ऑगस्ट २०२५ । सोने चांदी खरेदीचा प्लॅन करणाऱ्या ग्राहकांना मोठा झटका देणारी बातमी आहे. जळगाव शहरातील सुवर्ण बाजारपेठेत सलग तिसऱ्या दिवशी सोन्यासह चांदी दरात मोठी वाढ झाली. शनिवारी सोने दरात १००० रुपयांची तर चांदी दरात तब्बल ३०९० रुपयांची वाढ झाली. यामुळे जळगावच्या सराफ बाजारात चांदी दराने नवीन विक्रमी उच्चांक गाठला आहे. ऐन सणासुदीच्या दिवसात सोन्याचे दर वाढल्याने ग्राहकांच्या खिशाला फटका बसणार आहे. Gold Silver Rate

शहरातील सुवर्ण बाजारपेठेत गेल्या काही दिवसांपासून सोने आणि चांदीच्या दरात मोठे चढ-उतार सुरू असल्याचे दिसून येत आहे. या आठवड्याच्या सुरुवातीच्या तीन दिवसात सोने दरात घसरण झाली. त्यात ८०० रुपयांहून अधिकची घसरण झाली होती. यामुळे सोन्याचा दर विनाजीएसटी एक लाखाच्या खाली आल्याने ग्राहकांना काहीसा दिलासा मिळाला होता. मात्र मागच्या तीन दिवसात पुन्हा मोठी वाढ झाली. यामध्ये सोन्याच्या भावात २१ ऑगस्ट रोजी ३०० रुपये, २२ रोजी १०० आणि २३ रोजी १००० रुपयाची वाढ झाली. यामुळे सोन्याचा दर पुन्हा लाखाच्या वर गेला आहे.

आता काय आहे सोन्याचा दर?
जळगाव सराफ बाजारात आज सकाळच्या २४ कॅरेट सोन्याचा दर विनाजीएसटी १००६०० (जीएसटीसह १०३६१८) रुपये प्रती तोळ्यावर पोहोचले आहे. तर २२ कॅरेट सोने ९२,२२० (जीएसटी ९४,९८६) रुपये प्रती तोळ्यावर पोहोचले आहे.
चांदीचा दर?
चांदी दरातही गेल्या तीन दिवसात मोठी वाढ झाली. चांदीच्या भावात २१ ऑगस्ट रोजी २ हजार, २२ रोजी १ हजार आणि २३ रोजी तब्बल ३०९० रूपयांची वाढ झाली. यामुळे आज सकाळच्या सत्रात चांदीचा एक किलोचा दर ११८००० रुपयावर पोहोचले. तर एक किलो चांदीसाठी जीएसटीसह १ लाख २१ हजार ५४० रुपये मोजावे लागणार आहे. चांदीचा हा दर आजपर्यंत उच्चांकी दर ठरला आहे. जळगावात चांदीने गाठलेला उच्चांकी टप्पा लक्षात घेता ग्राहकांना मोठा धक्का बसला.
आंतरराष्ट्रीय बाजारातील अस्थिर परिस्थिती तसेच गुंतवणूकदारांचा सुरक्षित गुंतवणुकीकडे वाढता कल, यामुळे दोन्ही मौल्यवान धातूंना मोठी मागणी निर्माण झाल्याने सोने चांदीचे दर वाढले आहे. ऐन सणासुदीच्या दिवसात सोन्यासह चांदीचे दर वाढल्याने ग्राहकांच्या खिशाला फटका बसणार आहे. अवघ्या काही दिवसावर गणेशोत्सव सुरु होणार असल्यामुळे अनेकजण सोने-चांदीचे दागिने खरेदी करतात.परंतु आता सोने पुन्हा महागल्याने सोने खरेदी करावे की नाही असा प्रश्न पडला आहे.












