जळगाव लाईव्ह न्यूज । २१ ऑगस्ट २०२५ । जळगावच्या सुवर्ण नगरीत रक्षाबंधनाच्या तोंडावर विक्रमी पातळी गाठणाऱ्या सोन्यासह चांदी दरात घसरण झाली आहे. युक्रेन आणि रशियामधील युद्ध संपुष्टात येण्याची चिन्हे असताना, सोने आणि चांदीच्या किमतीत घसरण होत आहे.जळगावमध्ये या आठवड्याच्या सलग तिसऱ्या दिवशी सोने दरात घसरण झाली. यामुळे विनाजीएसटी सोन्याचा दर १ लाखाच्या खाली आहे. सोबतच चांदी दरात देखील मोठी घसरण झाल्याने ग्राहकांना काहीसा दिलासा मिळाला.

जळगाव सराफ बाजारात काल बुधवारी २४ कॅरेट आणि २२ कॅरेट सोने दरात घसरण दिसून आली. २४ कॅरेट सोन्याचा दर ३०० रुपयांनी घसरण ९९,००० (जीएसटी १०१९७०) रुपये प्रति १० वर पोहोचला आहे. सोबतच २२ कॅरेट सोन्याचा दर २७५ रुपयांनी घसरून ९०७५३ (जीएसटी ९३४७५) रुपयावर पोहोचला आहे. दुसरीकडे चांदी दरात तब्बल २००० रुपयाची घसरण दिसून आली. यामुळे आता चांदीचा एक किलोचा दर विनाजीएसटी ११३००० रुपयावर पोहोचला आहे.

८ ऑगस्टला सोन्याच्या दरानं उच्चांक गाठला होता, २४ कॅरेट सोन्याचा दर त्यावेळी जीएसटीविना १०१६०० रुपयांवर होता, त्यानंतर सोनं २६०० रुपयांहुन कमी झालं आहे. तर चांदी दर १ लाख १७००० रुपयापर्यंत पोहोचला होता. यानंतर चांदी दरात देखील ३५०० ते ४००० हजार रुपयापर्यंत घसरली झाली. दरम्यान या आठवड्याच्या सलग तिसऱ्या दिवशी सोने दरात घसरण झाली. मागच्या तीन दिवसात सोने दरात ८०० रुपयांहून अधिकची घसरण झाली.
घसरणीमागचे कारण काय?
जागतिक बाजारपेठेचा सोने आणि चांदीच्या किमतींवर मोठा परिणाम होतो. अलिकडेच चीन आणि युरोपमधील आर्थिक मंदीच्या बातम्यांमुळे कमोडिटी मार्केटमधील अस्थिरता वाढली आहे. अमेरिकन डॉलर मजबूत झाल्यामुळे सोन्याच्या किमतीवरही दबाव आला आहे. जर डॉलर मजबूत झाला तर भारताला सोने आयात करणे महाग होते. परंतु जेव्हा जागतिक मागणी कमी होते तेव्हा किमती खाली येतात. दुसरे म्हणजे, भू-राजकीय स्थिरतेमध्ये रशिया आणि युक्रेनमधील तणाव कमी झाल्याच्या बातमीनेही सोन्याच्या मागणीवर परिणाम झाला आहे. अस्थिरतेच्या काळात सोने ही सुरक्षित गुंतवणूक मानली जाते. जेव्हा जागतिक तणाव कमी होतो तेव्हा गुंतवणूकदार सोन्याऐवजी इतर मालमत्तांमध्ये गुंतवणूक करतात. यामुळे किमतीही खाली येतात.










