जळगाव लाईव्ह न्यूज । २ ऑगस्ट २०२५ । मागच्या जुलै महिन्यात सोन्याच्यासह चांदी दराने नको तो विक्रम गाठल्याने खरेदी दरांना मोठा झटका बसला. काही दिवसात सणासुदीचे दिवस सुरु होत असून या काळात अनेक ग्राहक सोने चांदी खरेदी करतात. देशात शुद्ध सोन्यासाठी प्रसिद्ध असलेल्या जळगावच्या सुवर्णनगरीत १० दिवसांपूर्वी म्हणजे २३ जुलैला चांदीचे दर उच्चांकी एक लाख २० हजार रूपये प्रति किलोपर्यंत जाऊन पोहोचले होते. तर सोन्याचा दर जीएसटीसह प्रति तोळा एक लाख तीन हजार ८२४ रूपयांपर्यंत होते. मात्र आता तब्बल ६ हजाराने दर खाली आल्याने चांदीचा तोरा आता उतरला आहे. सोन्याच्या दरातही घट नोंदविण्यात आल्याने ग्राहकांना थोडाफार दिलासा मिळाला आहे.

गेल्या दहा दिवसात सोन्याच्या दरात १०३० रूपयांची घट झाल्याचे दिसून आले. मात्र अद्यापही जीएसटीसह सोन्याचा दर एक लाखाच्या वर आहे. परंतु विक्रमी किमतीपासून सोने दर खालावल्याने व्यावसायिकांनीही सुटकेचा निःश्वास सोडला.

सोने आणि चांदीच्या किमतीत सध्या झालेली घसरण ग्राहकांसाठी खरेदीची एक चांगली संधी ठरू शकते, असे अनेक सुवर्ण व्यवसायातील तज्ज्ञांचे मत आहे. विशेषतः सण-उत्सव आणि लग्न समारंभासाठी किंवा दीर्घकालीन गुंतवणुकीसाठी सोने आणि चांदी खरेदी करण्याचा विचार करणाऱ्यांसाठी ही योग्य वेळ असू शकते. ऑगस्ट महिन्यात बाजारात झालेल्या हालचाली लक्षात घेतल्या असता, खरेदी करण्यापूर्वी सध्याच्या दरांची अचूक माहिती घेणेही तितकेच आवश्यक आहे.
दुसरीकडे, काही आर्थिक विश्लेषकांचे म्हणणे आहे की दिवाळीपर्यंत चांदीची किंमत पुन्हा एक लाख २० हजार रुपये प्रति किलोपर्यंत जाऊ शकते. अशा स्थितीत, चांदी ही फक्त पारंपरिक दागिन्यांपुरती मर्यादित न राहता एक मजबूत गुंतवणूक पर्याय म्हणूनही पुढे येऊ शकते. त्यामुळे ज्या ग्राहकांना स्थिर आणि सुरक्षित गुंतवणुकीचा पर्याय हवा आहे, त्यांनी सध्याची संधी विचारपूर्वक वापरणे हितावह ठरू शकते.









