जळगाव लाईव्ह न्यूज । १७ ऑगस्ट २०२५ । गेल्या आठवड्यात नवीन विक्रमी दर गाठलेल्या सोने दरात आता घसरण दिसून आलीय. जळगावच्या सुवर्णबाजारात सोने दरात घसरण झालीय. दुसरीकडे चांदी दरातही घसरण झाली. उच्चांकीपासून सोने जवळपास २ हजार रुपयांहून अधिकने घसरले तर चांदी जवळपास ३५०० हजार रुपयाहुन अधिकने घसरले.यामुळे आगामी सणासुदीसाठी खरेदी करणाऱ्या ग्राहकांना काहीसा दिलासा मिळाला.

काही दिवसापूर्वी ट्रम्प यांनी भारतीय आयातीवर २५ टक्के अतिरिक्त शुल्क लावण्याची घोषणा केल्यानंतर जळगावच्या सुवर्ण बाजारपेठेत सोन्याचे दर विक्रमी पातळीवर पोहोचले होते. ९ ऑगस्ट रोजी सोने जीएसटीसह प्रति तोळा १ लाख ४ हजाराच्या वर पोहोचला होता. हा सोन्याचा सर्वकालीन उच्चांक दर ठरला होता दुसरीकडे, चांदीही एक लाख २० हजाराच्या उंबरठ्यावर जाऊन पोहोचली होती.

दोन्ही धातुंच्या किमतीत झालेल्या वाढीने ग्राहकांसह व्यावसायिक चांगलेच धास्तावले होते. मात्र, यथावकाश विशेषतः सोन्याच्या दरात बऱ्यापैकी घसरण झाल्याने विक्रेत्यांसह खरेदीदारांना दिलासा मिळाला आहे. जन्माष्टमीच्या दिवशी देखील देशभरातील सुवर्ण बाजारात सोने आणि चांदीच्या किमतीत चढ-उतार दिसून आले. सणासुदीच्या काळात सोने आणि चांदीची मागणी सहसा वाढते; परंतु, शनिवारी सोन्याच्या किमतीत घट झाल्याचे दिसून आले.
जळगाव सराफ बाजारात आज रविवारी सकाळच्या सत्रात २४ कॅरेट सोन्याचा भाव विनाजीएसटी ९९,९०० ( जीएसटीसह १ लाख २ हजार ८९७) रुपये प्रति तोळा इतका आहे. तर चांदीचा दर ११६००० रुपये प्रति किलो इतका आहे. दरम्यान उच्चांकीपासून सोने जवळपास २ हजार रुपयांहून अधिकने घसरले तर चांदी जवळपास ३५०० हजार रुपयाहुन अधिकने घसरले. दरम्यान, मोठे सण लक्षात घेता सोने चांदीचे दर कुठवर जाणार याकडे ग्राहकांचे लक्ष लागून आहे.










