जळगाव लाईव्ह न्यूज । १३ मे २०२६ । सोने आणि चांदी खरेदीचा प्लॅन करणाऱ्या ग्राहकांना घाम फोडणारी बातमी आहे. जळगाव सराफा बाजारात आज अभूतपूर्व दरवाढ पाहायला मिळाली असून, सोन्या-चांदीच्या किंमतींनी अक्षरशः विक्रमी झेप घेतली आहे. जागतिक पातळीवरील तणावपूर्ण परिस्थिती आणि केंद्र सरकारने आयात शुल्कात केलेल्या मोठ्या वाढीमुळे जळगावात एकाच दिवसात सोन्याच्या दरात तब्बल १२ हजार रुपयांची, तर चांदीच्या दरात ३० हजार रुपयांची वाढ नोंदवण्यात आली आहे. या दरवाढीमुळे सराफा बाजारात मोठी खळबळ उडाली असून ग्राहक आणि व्यापारी दोघांनाही मोठा धक्का बसला आहे.

केंद्र सरकारने मौल्यवान वस्तूंवर १५ टक्के आयात शुल्क (Import Duty) लागू करण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. सरकारच्या या एकाच निर्णयामुळे देशांतर्गत बाजारात सोन्या-चांदीच्या किमतींनी थेट गगन गाठले. आगामी काळात देखील सोने आणि चांदीमध्ये अशीच विक्रमी भाववाढ सुरू राहू शकते, असा अंदाज सोने तज्ज्ञांनी वर्तवला आहे.

लग्नसराईत ‘वधू-वरांच्या’ कुटुंबाचे बजेट कोलमडले!
सध्या लग्नसराईचे दिवस जोरात सुरू असून विवाहकार्यासाठी वधू-वरांच्या कुटुंबाकडून सोन्या-चांदीचे दागिने मोठ्या प्रमाणात खरेदी केले जातात. मात्र, लग्नाच्या ऐन हंगामातच दोन्ही धातूंच्या दरात ऐतिहासिक वाढ झाल्यामुळे सर्वसामान्य कुटुंबांचे आर्थिक बजेट पूर्णपणे कोलमडले आहे.
काय आहे भाव?
जळगावची सुवर्णनगरी शुद्ध सोन्यासाठी संपूर्ण देशात प्रसिद्ध आहे. येथे दररोज ग्राहकांची मोठी गर्दी असते. मात्र, आज सोने-चांदी दरात विक्रमी वाढ झाली. जळगावच्या बाजारात एकाच दिवसात सोन्याचे दर १२ हजार रुपये आणि तर चांदीचे दर हे ३० हजाराने वाढले आहेत. यानंतर २४ कॅरेट सोन्याचे दर आज जीएसटीसह १ लाख ६२ हजार रुपये जाऊन पोहोचले आहे तर चांदीचे दर जीएसटीसह २ लाख ९८ हजार रुपयांवर जाऊन पोहोचले आहे.
आगामी काळातही सोन्या-चांदीच्या किंमती आणखी वाढू शकतात, असा अंदाज तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे. त्यामुळे ग्राहकांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले असून, पुढील काही दिवस सराफा बाजारासाठी महत्त्वाचे ठरणार आहेत.












