जळगाव लाईव्ह न्यूज । १५ मे २०२६ । केंद्र सरकारने सोन्या-चांदीच्या आयात शुल्कात (Import Duty) वाढ केल्यानंतर दोन्ही धातूंच्या दरात मोठी उसळी पाहायला मिळाली. यामुळे ग्राहकांना मोठा झटका बसला होता. मात्र अशातच सुवर्णनगरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जळगावच्या सराफ बाजारातूनएक मोठी आणि दिलासादायक बातमी समोर आली आहे.

गेल्या २४ तासांत सोन्या आणि चांदीच्या किमतीमध्ये कमालीची घसरण झाली आहे. सोन्याच्या दरात अडीच हजार रुपयांची, तर चांदीच्या दरात तब्बल २० हजार रुपयांची ऐतिहासिक घसरण नोंदवली गेली आहे. या घसरणीमुळे लग्नसराईचा दागिने बनविणाऱ्या ग्राहकांना काहीसा दिलासा मिळाला आहे.

या घसरणीनंतर जळगाव सराफ बाजारात सोन्याचे दर जीएसटीसह १ लाख ६२ हजार २२५ तर चांदीचे दर जीएसटीसह २ लाख ७३ हजार ९८० रुपये झालेत. दोन दिवसांपूर्वी सोन्या-चांदीचे दर कडाडल्याने बाजारातील ग्राहकांची संख्या घटली होती. मात्र, आज अचानक मोठी घसरण झाल्याने महिला वर्गात उत्साहाचे वातावरण आहे.
सराफ व्यावसायिकांनी दिलेल्या माहितीनुसार, जागतिक बाजारपेठेत कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी वाढ झाली असून पेट्रोल आणि डिझेलचे दर वधारले आहेत. कच्च्या तेलाच्या किमती वाढल्यामुळे जागतिक स्तरावर मोठ्या गुंतवणूकदारांनी सोन्या-चांदीच्या गुंतवणुकीतून आपला पैसा काढून थेट कच्च्या तेलात गुंतवण्यास सुरुवात केली आहे. सोन्या-चांदीच्या बाजारातून गुंतवणूकदार बाहेर पडल्यामुळेच या दोन्ही धातूंच्या किमती एकदम खाली आल्या आहेत. आगामी काळात हे दर आणखी घसरण्याची शक्यताही व्यापाऱ्यांनी व्यक्त केली आहे.











