जळगाव लाईव्ह न्यूज । ९ सप्टेंबर २०२५ । जागतिक व्यापार आणि भूराजकीय तणावामुळे सोने आणि चांदीच्या किमती वाढतच आहेत. काल सोमवारी जळगावच्या सुवर्णबाजारात सोन्याच्या किमतीने पुन्हा एकदा विक्रमी पातळी गाठली आहे. इतिहासात पहिल्यांदाच जळगावमध्ये सोन्याचा तोळा विनाजीएसटी १ लाख १० हजाराच्या वर पोहोचला आहे. यामुळे ऐन सणासुदीत खरेदीचा प्लॅन करणाऱ्या ग्राहकांचे हौश उडाले आहे.

नुकताच गणेशोत्सव पार पडला. यांनतर आता नवरात्री, दसरा आणि त्यांनतर दिवाळी सारखे सण काही दिवसावर येऊन ठेपले आहे. भारतात सणासुदीत सोने आणि चांदी खरेदीला महत्व दिल जाते. मात्र यंदा सोन्यासह चांदीच्या किमतीने नको तो विक्रम गाठला आहे. यामुळे सोने चांदी खरेदी करणे सर्वसामान्य ग्राहकांच्या आवाक्या बाहेर गेले आहे.

जळगाव सराफ बाजारात काल सोमवारी सोने १६०० रुपयांनी वाढून १०८५०० (जीएसटीसह १११७५५) रुपये तोळ्यावर पोहोचले. हा सोन्याचा सर्वकालीन उच्चांकी दर ठरला. सोने गेल्या आठवड्यात १९०० रुपयांनी महागले आहे. आगामी पंधरवड्यात सोन्याच्या दरात तेजीच स्थिती राहणार असल्याचा जाणकारांचा अंदाज आहे. चांदीच्या दरात सोमवारी कोणतीही वाढ नोंदवली गेली नाही. सध्या चांदीचा दर १ लाख २५ हजार रुपये प्रति किलो इतका आहे.
पुढील पंधरवड्यात दर अजून वाढेल
अमेरिकेने व्यापारावर लावलेल्या टेरिफ कराबाबत अनेक देश नाराज आहेत. तसेच रशिया व युक्रेन यांच्यातील युद्ध पूर्णपणे बंद झालेले नाही. त्याचे पडसाद सोन्याचे दर वाढण्यावर होत आहे. आगामी पंधरवड्यात सोन्याच्या दरात आणखी दोन ते अडीच हजारांची वाढ होण्याची शक्यता आहे, असा अंदाज आंतरराष्ट्रीय सोने बाजाराचे अभ्यासक यांनी वर्तवला आहे.












