जळगाव लाईव्ह न्यूज । २७ सप्टेंबर २०२५ । जळगावच्या सुवर्ण पेठेत सोन्यासह चांदीच्या दरात मोठी उलथापालथ दिसून येत आहे. सलग दुसऱ्या दिवशी चांदी दराने मोठी उसळी घेतली. गेल्या २४ तासांत चांदी दरात तब्बल ४००० रुपयांची वाढ झाली. यामुळे गेल्या दोन दिवसात चांदी दरात ७००० हजार रुपयाची वाढ झाली. दरम्यान दुसरीकडे सोने दरवाढीला ब्रेक लागला असून गेल्या २४ तासांत सोने दरात ६०० रुपयापर्यंतची घसरण झाली.

एकीकडे दसरा सण अगदी जवळ येऊन ठेपला असून यानंतर दिवाळी सण साजरा होईल. या सणासुदीच्या काळात अनेक जण सोने आणि चांदी खरेदीला महत्व देतात. मात्र यंदा दोन्ही धातूंच्या दरात मोठी वाढ झाल्याने खरेदीकर्त्यांना घाम फुटला आहे. दरवाढीमुळे सोने आणि चांदीचे दर आवाक्या बाहेर गेले असून यामुळे खरेदी करावी की नाही असा प्रश्न ग्राहकांना पडला आहे.

आताचे भाव काय?
जळगाव सराफ बाजारात शनिवारी २४ कॅरेट सोने दरात ६०० रुपयाची घसरण होऊन ते विनाजीएसटी १,१३,९०० रुपये प्रति १ तोळ्यावर पोहोचला. हाच दर जीएसटीसह १,१७,३१७ रुपये इतका आहे. दुसरीकडे चांदी दराने सर्व विक्रम मोडीत काढले आहे.
शुक्रवारी चांदी दरात ३००० रुपयाची वाढ झाली असताना शनिवारी चांदी दरात तब्बल ४००० रुपयाची वाढ झाली. यामुळे सध्या चांदीचा एक किलोचा दर १,४३,००० रुपयांवर पोहोचले आहे. तर जीएसटी चांदी आता १,४७,२९० रुपयांवर पोहोचली.
या कारणामुळे चांदी वधारली
चांदीच्या दरवाढीमागे जागतिक पातळीवर वाढलेली औद्योगिक मागणी हे प्रमुख कारण मानले जात आहे. परिणामी, त्याचा थेट परिणाम दरांवर झाला असून चांदीने विक्रमी पातळी गाठली आहे. सुवर्ण व्यापारातील जाणकारांच्या मते, येत्या काही आठवड्यांत सोन्याच्या व चांदीच्या दरात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. जागतिक बाजारपेठेत सुरु असलेली आर्थिक अनिश्चितता, डॉलरचा दर, क्रूड ऑइलचे भाव आणि व्याजदरांमध्ये होणारे बदल याचा थेट परिणाम सोन्या-चांदीच्या किंमतींवर होत असतो. त्यामुळे गुंतवणूकदारांनी आणि खरेदीदारांनी या घडामोडींवर बारकाईने लक्ष ठेवणे गरजेचे आहे, असा सल्ला तज्ज्ञांकडून दिला जात आहे.









